संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्यावतीने दामुअण्णा महाराज शिंगणे यांचा सत्कार

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

चिखली (अंकुश पाटील) – महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान जिल्हास्तरीय शासकीय निवड समितीवर बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कमिटीचे विश्वस्त पुरुषोत्तम दादा पाटील आणि पालखीचे मानाचे चोपदार राजाभाऊ महाराज यांच्या हस्ते श्रीफळ व शाल प्रदान करून हा सन्मान करण्यात आला.

काल (दिनांक २३ ऑगस्ट २०२६) पुण्यपावन एकादशीच्या पवित्र पर्वावर शिंगणे महाराज माऊलीच्या समाधी दर्शनासाठी आळंदी येथे पोहोचले होते. यावेळी संस्थान कमिटीच्या विश्वस्तांनी त्यांना कार्यालयात बोलावून त्यांचा गौरव केला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना विश्वस्त पुरुषोत्तम दादा पाटील म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड करून वारकरी संप्रदायाला खरा न्याय दिला आहे.” तसेच, शिंगणे महाराज इतर क्षेत्रातील कलावंतांप्रमाणेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक व इतर गुणवंतांना या योजनेत नक्कीच प्राधान्य देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

माऊलीच्या दरबारात झालेला हा सत्कार आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना श्री. दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. या महत्त्वपूर्ण सत्काराच्या वेळी विश्वस्त पुरुषोत्तम दादा पाटील, राजाभाऊ चोपदार, कीर्तन केसरी पुरुषोत्तम महाराज भुतेकर, गोविंद महाराज गोरे, निवृत्ती महाराज कदम, शंकरजी महाराज, प्रदीप महाराज बनकर, विकास महाराज पाटील, बळीराम महाराज जोगदंड, विष्णु महाराज वडजे, नंदकिशोर महाराज गोरे यांच्यासह अनेक वारकरी आणि कीर्तनकार उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version