बुलढाणा जिल्हा बँकेवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्विवाद वर्चस्व; ‘सहकार’ला १९ जागा, तर ‘परिवर्तन’नेही मोडली एकहाती सत्ता!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

२१ पैकी १९ जागांवर सहकार पॅनेलचा झेंडा; सत्तेविना नैतिकतेच्या बळावर डॉ. शिंगणेंची राजकीय जादू, तर शेगावच्या पाटील घराण्याचे तीन सदस्य संचालक मंडळात!

बुलढाणा (बाळू वानखेडे) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून, ‘सहकार’ पॅनेलला १९ जागा मिळाल्या आहेत. मात्र, ‘परिवर्तन’ पॅनेलनेही दोन जागा जिंकत एकहाती सत्तेला छेद दिला आहे. या बहुचर्चित निवडणुकीत डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवला आहे. प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या सातपैकी पाच जागांवर बाजी मारत २१ सदस्यीय संचालक मंडळात आता डॉ. शिंगणे यांच्या पॅनेलचे तब्बल १९ संचालक विराजमान झाले आहेत. तरीही ऐनवेळी रिंगणात उतरलेल्या ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ने दोन जागा जिंकत जिल्ह्याच्या सहकारातील एकछत्री अंमलाला छेद दिला आहे.

सध्या आमदारकी किंवा खासदारकी नसतानाही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्याच्या सहकारात आपले वर्चस्व सिद्ध केले असून, एका आमदाराचा अपवाद वगळता सर्वपक्षीय आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. तब्बल २९८ नामांकन अर्जांपैकी केवळ २३ अर्ज कायम राहिले. सत्तेविना केवळ नैतिकतेच्या बळावर २७५ दिग्गजांना माघार घ्यायला लावणे, हे डॉ. शिंगणे यांच्या राजकीय कसबाचे मोठे यश मानले जात आहे. या यशानंतर डॉ. शिंगणे यांनी समाजमाध्यमांवरील आपला ‘प्रोफाइल पिक्चर’ बदलला असून, सहकाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याच्या आनंदात फेटा व जॅकेट परिधान केलेले त्यांचे छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे.

या निवडणुकीत शेगाव येथील पाटील परिवारातील तीन सदस्य आता बँकेच्या संचालक मंडळात असणार आहेत. शेगाव सोसायटीतून पांडुरंगदादा पाटील अविरोध, नागरी बँका मतदारसंघातून ज्ञानेश्वरदादा पाटील, तर संग्रामपूर सोसायटीतून त्यांच्या बहिणीचा मुलगा श्रीकांत मारोडे विजयी झाले आहेत. दुसरीकडे, ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ने ट्रॅक्टर या निशाणीवर नागरी बँका आणि मलकापूर सोसायटी मतदारसंघात विजय मिळवत ‘सहकार’च्या छत्री निशाणीला छेद दिला आहे.

निकालांवर नजर टाकल्यास, सहकार पॅनेलचे इतर मागासवर्गीय मतदारसंघातून गोविंदराव गणपत मिरगे, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून डॉ. संजय भास्करराव रायमुलकर, लोणार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था मतदारसंघातून ३० मते मिळवत गोविंद शेषराव मापारी, संग्रामपूर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था मतदारसंघातून १५ मते मिळवत श्रीकांत दादाराव मारोडे, महिला राखीव मतदारसंघातून पुष्पाबाई रामदास बारवकर व अस्मिता प्रदीप हेलगे, तर इतर सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून सुनील राजाराम उदयकर विजयी झाले आहेत.

तसेच, शेतकरी परिवर्तन पॅनेलचे ज्ञानेश्वर पाटील नागरी सहकारी बँका मतदारसंघातून, तर शिवचंद्र तायडे मलकापूर सोसायटी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बहुतांश दिग्गजांना एकत्र बांधून ठेवत जिल्हा बँकेवरील आपली पकड घट्ट केली असली तरी, ‘परिवर्तन’ पॅनेलने मिळवलेले दोन विजय भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात.

सहकार पॅनेलचे प्रमुख विजयी उमेदवार

१) इतर सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघ : सुनील राजाराम उदयकर
२) इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघ : गोविंदराव गणपत मिरगे
३) प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, संग्रामपूर : श्रीकांत दादाराव मारोडे
४) महिला राखीव मतदारसंघ : पुष्पाबाई रामदास बारवकर
५) महिला राखीव मतदारसंघ : अस्मिता प्रदीप हेलगे
६) अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ : डॉ. संजय भास्करराव रायमुलकर
७) प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, लोणार : गोविंद शेषराव मापारी

शेतकरी परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार

१) नागरी सहकारी बँका/वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ : ज्ञानेश्वर पाटील
२) सोसायटी मतदारसंघ, मलकापूर : शिवचंद्र तायडे

पॅनेलनिहाय कामगिरी आणि निशाणी

सहकार पॅनेल
निशाणी : छत्री
एकूण जागा : ९
उभे केलेले उमेदवार : ८
विजयी उमेदवार : ७

स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल
निशाणी : ट्रॅक्टर
उभे केलेले उमेदवार : ७
विजयी उमेदवार : २

Share This Article
Exit mobile version