शर्वरी मिसाळची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-परभणीतील राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचा गौरव; अक्षरा पांडव व आरोही क्षीरसागर यांना कांस्यपदक

चिखली (राजेंद्र घुबे) : २१ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कु. शर्वरी मीना प्रवीण मिसाळ हिने बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत फेन्सिंग (इप्पी) या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत रौप्यपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिची जम्मू-काश्मीर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कु. अक्षरा पांडव आणि कु. आरोही क्षीरसागर यांनीही स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.

कु. शर्वरी मिसाळ हिच्या यशामध्ये तिची आई सौ. मीना मिसाळ (जगताप) यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच तिचे प्रशिक्षक श्री. आकाश बनसोड सर (NIS Coach), बुलढाणा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव शिवश्री शेषनारायण लोढे सर, राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा अध्यक्ष शिवश्री शिवाजी राजे जाधव, उपाध्यक्ष शिवश्री मयूर पाटील बाहेकर आणि सहसचिव शिवश्री नितीन पाटील जेऊघाले यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. शर्वरी ही शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख स्व. शांताराम जगताप यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सचिव तथा मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील, आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, ‘पीएमआरडीए’चे माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तलवारबाजी स्पर्धेसाठी दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांनी स्वतः मेहनत घेत कमी खर्चात जिल्हा तलवारबाजी केंद्र उभारले आहे. या केंद्रातून मेहनतीने खेळाडू तयार केले जात असून, त्याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना होत आहे. खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व प्रशिक्षक, पदाधिकारी आणि पालकांचे योगदानही या यशामध्ये महत्त्वाचे ठरले आहे. शर्वरी मिसाळ हिची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी झालेली निवड ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, तिच्या या यशाबद्दल सर्व पालक, खेळाडू, बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन तसेच शिवश्री प्रवीण मिसाळ सर (जिल्हा समन्वयक, संभाजी ब्रिगेड तथा संपादकीय संचालक, ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज मीडिया) यांच्या वतीने शर्वरीसह अक्षरा पांडव आणि आरोही क्षीरसागर यांचे अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु. शर्वरी मिसाळ हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Share This Article
Exit mobile version