बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत १,८५७ पैकी १,७५१ मतदारांनी बजावला हक्क; निकालाकडे लक्ष

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-९४.०३ टक्के मतदान; उद्या बुलढाणा येथे मतमोजणी

सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत एकूण १,८५७ पैकी १,७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९४.०३ टक्के आहे. उद्या सकाळी बुलढाणा येथे मतमोजणी होणार असून, या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला वगळता सर्वांनी याला सहमती दर्शविल्याने निवडणूक बिनविरोध होता होता राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी पाच जागांची मागणी केली होती. मात्र, सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दोन जागा देण्यास सहमती दर्शवली. परंतु काही राजकीय नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अगोदरच सहकार पॅनेलचे १३ संचालक बिनविरोध निवडून आलेले असताना उर्वरित आठ जागांसाठी ही निवडणूक झाली.

सहकार पॅनेलची निवडणूक रणनीती अगोदरच ठरलेली होती. प्रचारात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कोणतीही कसर न ठेवता संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. तर परिवर्तन पॅनेलची धुरा आमदार मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी सांभाळत जमेल तेवढे प्रयत्न केले. सहकार क्षेत्रात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे प्राबल्य आहे, हे नाकारून चालणार नाही. सहकार क्षेत्रात राजकीय नेत्यांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा कै. भास्करराव शिंगणे यांनी सुरू केली. आजतागायत ही परंपरा डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कायम ठेवली आहे. या निवडणुकीत आपला किती प्रभाव राहील आणि आपण किती परिवर्तन घडवून आणू शकतो, याचा अभ्यास मनोज कायंदे यांनी करायला पाहिजे होता. मात्र, सल्लागार मंडळींनी त्यांना रिंगणात ओढले असून, किती परिवर्तन होणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. आज १,८५७ पैकी १,७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर सहकारी संस्था मतदारसंघात १०० टक्के, ग्रामसेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ९८.०६ टक्के, कृषी उत्पन्न प्रक्रिया मतदारसंघात ९६ टक्के, तर नागरी पतसंस्था मतदारसंघात ९२.०२ टक्के मतदान झाले.

बुलढाणा येथे २३८, चिखली १९९, मलकापूर १०८, मोताळा १६४, नांदुरा ११३, शेगाव ११३, खामगाव ९७, जळगाव जामोद ११५, संग्रामपूर १२५, मेहकर १३८, लोणार १०४, सिंदखेडराजा १२८ आणि देऊळगाव राजा येथे १०९ मतदारांनी मतदान केले. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक मतदार शेंदुर्जन येथील असून, त्यांनी एकाचवेळी सिंदखेडराजा येथे मतदान केले. सिंदखेडराजा येथील मतदान केंद्रावर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सर्व १२८ मतदार त्यांच्या सोबत होते. यात माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी प्राचार्य डी. एन. पांचाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version