-भव्य मिरवणूक काढत प्रत्येक मंदिरात जलाभिषेक; १,००८ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून कावड यात्रा नगरीत येणार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील सनातन हिंदू युवकांनी यावर्षी प्रयागराज येथून जल आणून कावड यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, २४ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी साखरखेर्डा नगरीतून भव्य कावड यात्रा काढण्यात येणार आहे.
प्रयागराज येथून २४ जुलै रोजी निघालेली सनातन कावड यात्रा तब्बल १,००८ किलोमीटरचा पायी प्रवास करून उद्या सकाळी १० वाजता साखरखेर्डा नगरीत दाखल होणार आहे. भोगावती नदीवरील श्री महाकालेश्वर मंदिर परिसरात कावड यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर वाजत-गाजत कावड यात्रा गणपती चौक, गुजरी चौक, दगडी मशीद, श्री पलसिद्ध महास्वामी मठ, बसस्थानक परिसरातून मार्गक्रमण करीत हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह नगर येथे पोहोचेल. येथे कावड यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
२२ ऑगस्ट रोजी कावड यात्रा कोलारा येथील विदेही कै. रामभाऊ महाराज यांच्या मठात मुक्कामी होती. २३ ऑगस्ट रोजी मोहखेड येथे मुक्काम करून २४ ऑगस्ट रोजी ती साखरखेर्डा येथे दाखल होणार आहे. साखरखेर्डा येथे कावड यात्रेदरम्यान विविध मंदिरांमध्ये जलाभिषेक करण्यात येणार आहे. या कावड यात्रेचे नेतृत्व ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष जिवणसिंग राजपूत, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, बादलसिंग राजपूत, इंद्रपालसिंग राजपूत, पिल्लू ठाकूर, आशिष कामे करीत आहेत. या कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून, भक्ती आणि भावनेचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे.

