– जानकीदेवी विद्यालयातील निवृत्त मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात
– ‘मातृभूमीतील सत्काराने भारावलो, याच मातीने मला घडवले!’; उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी व्यक्त केली कृतज्ञता
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा, तसेच जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य हरिदास घुबे आणि सहायक शिक्षक सुभाष हिवाळे यांचा सेवागौरव सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.
आपल्या मनोगतात राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रतापराव सपकाळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. “सध्याच्या काळात सामाजिक जबाबदारी घेण्यास फारसे कुणी पुढे येत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेणफडराव घुबे यांनी अतिशय उत्कृष्टपणे शाळा चालवून परिसरातील विद्यार्थी घडवण्याचे महान कार्य केले आहे,” असे ते म्हणाले. शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी शेणफडराव घुबे यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, सेवानिवृत्त प्राचार्य आणि शिक्षकांनी उर्वरित आयुष्यातही शाळेविषयी आत्मीयता बाळगून, गरज पडेल तेव्हा शाळेला सहकार्य करावे आणि समाजसेवेचे व्रत सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि अकोल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “१९९१ मध्ये दादासाहेब घुबे यांनी या ग्रामीण परिसरात मुलींच्या शिक्षणाची मोठी सोय केली. आज मी शैक्षणिक क्षेत्रातून जी प्रगती साधली, त्याचे श्रेय या मातीला आणि शाळेला जाते. माझ्या कर्मभूमीत झालेला हा सत्कार मला भारावून टाकणारा आहे. माझ्या या जडणघडणीत दादासाहेबांचे मोठे योगदान आहे.”
याप्रसंगी प्रा. व्ही. एम. अंबासकर आणि माजी विद्यार्थी योगेश सरोदे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वैशालीताई घुबे, सदस्य डॉ. पुरुषोत्तम देवकर, जनार्दन घुबे, प्रकाश घुबे, आर. एस. जाधव, ब्रेकिंग महाराष्ट्रचे संपादकीय संचालक तथा मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ यांच्यासह परिसरातील नागरिक, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उद्धवराव घुबे यांनी केले.

