-उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : २४ ऑगस्ट रोजी कावड यात्रा आणि २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद सण-उत्सव शांततेत साजरे करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांनी सजग राहिले पाहिजे. कायदा हातात घेऊ नका, असा सल्ला शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी दिला.

साखरखेर्डा गावाने नेहमीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला असून, ईद-ए-मिलाद आणि कावड यात्रा शांततेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ईद-ए-मिलादनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले. यावेळी माजी सैनिक अर्जुन गवई, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, अस्लम अंजूम यांनी आपले विचार मांडले. शांतता समितीच्या बैठकीला ठाणेदार युवराज रबडे, माजी सरपंच कमलाकर गवई, भाजपाचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, सुनील जगताप, गोपाल राजपूत, शुभम राजपूत, रामदाससिंग राजपूत, दिलीप बेंडमाळी, संदीप खिल्लारे, इब्राहिम शहा, माजी सरपंच दाऊद कुरेशी, अन्नसार कुरेशी, असलम शहा, आयुब कुरेशी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

