पोलिस, आर्मी भरतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांनी हातात घेतली कुदळ; श्रमदानातून मैदानावर रनिंग ट्रॅक तयार

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-‘मैदान वाचवा, तरुणांचे भविष्य घडवा’; साखरखेर्डा येथील विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद पुढाकार

सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : पोलिस भरती तसेच आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे धावण्याचा सराव करता यावा, यासाठी साखरखेर्डा येथील विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. रस्त्यावर धावताना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन गावातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी थेट हातात कुदळ-फावडे घेत मैदानाची स्वच्छता केली आणि धावण्याच्या सरावासाठी रनिंग ट्रॅक तयार केला.

साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० व ८४३ मधील क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. मैदानावर विखुरलेले दगड-गोटे स्वतःच्या हाताने बाजूला काढत धावण्याच्या सरावासाठी मैदान तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे मैदान पुन्हा एकदा तरुणांच्या सरावासाठी सज्ज होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. विशेष म्हणजे, याच क्रीडांगणावर यापूर्वी नांगर फिरवून मैदानाचा वापर बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. मात्र, क्रीडांगणाचा वापर कायम राहावा आणि भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना सुरक्षित सरावाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेतला.

रस्त्यावरची ‘रनिंग’ नको; मैदानातच सुरक्षित सराव हवा!

पोलिस आणि सैन्य भरतीच्या तयारीत धावण्याचा सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने सराव करताना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गावातील आणि बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित क्रीडांगण उपलब्ध असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला. ‘खेळाचे मैदान वाचवा, तरुणांचे भविष्य घडवा’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

महसूल विभागाने आता मैदानाच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी!

विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदान करून मैदान विकसित करण्याचा प्रयत्न केला असताना संबंधित प्रशासनानेही या क्रीडांगणाची पाहणी करून त्याचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे. या श्रमदानात सामाजिक कार्यकर्ते श्याम खरात, विशाल गवई, सुधीर ठाकूर, संदीप मगर, सागर मगर, अंकुर देशपांडे यांच्यासह गावातील व बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

Share This Article
Exit mobile version