-रस्त्यावर वाहने उभी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्याची ग्रामस्थांची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : अंढेरा ते मलकापूर पांग्रा मार्गावर शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशरला दुचाकीने मागून धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यातील एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्च प्राथमिक उर्दू शाळेजवळ रस्त्यावर विरुद्ध दिशेने आयशर क्रमांक एमएच २८ बीबी ५६०४ उभा होता. दरम्यान, डोरव्ही येथे काही कामानिमित्त गेलेले आकाश तेजराव साळवे (वय २८) व त्यांच्यासोबत असलेले ताजीम नाझीम पठाण (वय १९) हे युनिकॉन दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए २२४९ वरून मलकापूर पांग्र्याकडे परत येत होते. त्यावेळी शाळेजवळ विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या आयशरला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने जखमींना मलकापूर पांग्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांनाही पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्त लिहेपर्यंत या घटनेप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नव्हती.
मलकापूर पांग्रा-अंढेरा मार्गाचे गेल्या वर्षी रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, या मार्गावर गावातील नागरिकांकडून सर्रासपणे वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची एकच बाजू वाहतुकीसाठी उपलब्ध राहत असल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या मार्गावर आयशरसारखे मोठे वाहन रस्त्यावर उभे नसते, तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा घटनेनंतर गावात सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून रस्त्यावरील अडथळे दूर करून संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

