-नाले, गटारे, साचलेले पाणी व मोकळ्या जागांवर जंतुनाशक फवारणी
लोणार (वाजिद खान) : पावसाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य रोगराईला आळा घालण्यासाठी लोणार नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून, शहरातील नाले, गटारे, साचलेले पाणी, मोकळ्या जागा तसेच पाण्याची डबकी असलेल्या ठिकाणी जंतुनाशक व कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे.
पावसामुळे साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. रस्त्यालगतची पाणी साचणारी ठिकाणे, नाले-गटारे आणि मोकळ्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने फवारणीची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील अनेक मोकळ्या जागांमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून, या ठिकाणीही कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणीही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेत कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे.
पावसाळ्यात डासांमुळे विविध आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराभोवती व परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, स्वच्छता राखावी तसेच नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या या फवारणीमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होऊन संभाव्य रोगराईला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. फवारणीच्या वेळी लोणार नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, उपाध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, आरोग्य सभापती अब्दुल उबेदभाई, नगरसेवक गुलाब सरदार, अरुण जावळे, संतोष मापारी, शुभम देसाई, साहेबराव पवार, शाम राऊत तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्यासह नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

