मुलाला वाचविताना वडिलांचा तोल गेला; पती आणि मुलाला दरीत कोसळताना पाहून आईनेही मारली उडी; छत्रपती संभाजीनगरमधील सुन्न करणारी घटना!
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) : येथील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पैशांवरून आणि ‘आयफोन १५’च्या हप्त्यांवरून झालेल्या वादानंतर नैराश्यातून आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आई-वडिलांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी (२१ ऑगस्ट) घडलेल्या या थरारक घटनेमुळे वाळूजसह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. कुणाल मुरलीधर चांदवडे, वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे अशी या दुर्दैवी घटनेतील मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कुणालचा त्याचे वडील मुरलीधर यांच्याशी वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात कुणाल सकाळी सुमारे १० वाजता खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच, त्याचे आई-वडील, स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजता ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर या घटनेची माहिती मिळाली. अंमलदार सुरेश भिसे आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलालाही पाचारण केले. कुणाल खाली पडल्यास त्याला वाचवण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी जाळी लावण्यात आली होती. तब्बल तीन तास कुणालचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, तो पोलिसांना आणि अग्निशमन दलाला चकवा देत वारंवार आपली जागा बदलत होता.
वडिलांच्या ‘त्या’ एका चुकीमुळे आणि आईच्या आक्रोशाने संपले कुटुंब!
बचाव कार्य सुरू असताना गर्दीत कुणालचे वडील मुरलीधर हे देखील उभे होते, ज्यांची ओळख पोलिसांना नव्हती. कुणालने डोंगराच्या कडेला जाऊन उडी घेण्याचा प्रयत्न करताच, वडील मुरलीधर यांनी अचानक पुढे जाऊन त्याला धरून ओढण्याचा (वाचवण्याचा) प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत मुलाने वडिलांना ओढून घेतल्याने त्यांचा तोल गेला आणि मुलासह तेही शेकडो फूट खाली कोसळले. डोळ्यांसमोर आपला तरुण मुलगा आणि पती खाली कोसळल्याचे पाहून धक्का बसलेल्या आई संगीता यांनीही एका क्षणाचाही विचार न करता त्यांच्यामागोमाग डोंगरावरून उडी मारली. तिघांचाही खाली पडून जागीच मृत्यू झाला.
आत्महत्येचे कारण: आयफोन आणि कौटुंबिक कलह
- आयफोनचा हट्ट: कुणालने हट्ट करून ‘Apple iPhone 15’ घेतला होता. मात्र, या मोबाईलचा हप्ता बाऊन्स झाल्याने आणि वडिलांकडून खर्चासाठी पैसे न मिळाल्याने तो प्रचंड नाराज होता.
- नैराश्य: “माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही,” असे नैराश्यपूर्ण शब्द त्याने आईसमोर व्यक्त केले होते. आत्महत्येपूर्वी त्याने आपला महागडा आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकून दिली होती.
- मागील शोकांतिका: चांदवडे कुटुंबावर यापूर्वीही मोठा आघात झाला होता. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे आजाराने निधन झाले होते. वडील मुरलीधर हे ट्रकचालक असल्याने सतत घराबाहेर असायचे, त्यामुळे कुटुंबात अनेकदा खटके उडत असत.
आईची ती मन हेलावणारी विनवणी
डोंगरावर कुणालला समजवताना आई संगीता यांनी आकांताने विनवण्या केल्या होत्या. “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते. तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते. आपण दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस,” असे म्हणत या माऊलीने स्वतःचे मंगळसूत्र काढून फेकले होते. परंतु, रागाच्या भरात असलेल्या कुणालने आईचे काहीही ऐकले नाही आणि क्षणात संपूर्ण चांदवडे कुटुंब उद्ध्वस्त झाले.
सध्या या प्रकरणाचा वाळूज पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू असून, तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एका मोबाईलच्या हट्टापायी आणि क्षणिक रागामुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा करूण अंत झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

