-क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश; जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दोन स्वतंत्र SOP जारी
चिखली (विनायक सरनाईक) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. मयत शेतकऱ्यांच्या वारसांची KYC होत नसल्याने तसेच वयस्कर शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण रखडले होते. त्यामुळे शेतकरी महा ई-सेवा केंद्र आणि तहसील कार्यालयात चकरा मारत होते. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी संबंधित शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेऊन या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयात शेतकऱ्यांचे स्वतंत्र अर्ज देऊन मोहीम राबविण्यात आली होती.

तहसील कार्यालय, चिखली येथे आढावा बैठक; बँकांना सूचना
२० ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, चिखली येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार, सहाय्यक निबंधक तसेच तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या मांडल्या. यावेळी मयत शेतकऱ्यांचे KYC, मुखत्यारपत्रामुळे तसेच मुलाच्या नावाने कर्ज आणि सातबारा वडिलांच्या नावावर असल्याने Farmer ID निघत नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. कर्जाच्या रकमेतील तफावतीबाबत प्रत्येक बँकेने स्टेट बँकेप्रमाणे यादी प्रसिद्ध करावी, तसेच निल दाखले देऊन शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
खासगी बँकेचा बोजा सातबाऱ्यावर असल्याने कर्जमाफी होऊनही पीक कर्ज मिळत नसल्याने त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत, सोमठाणा येथील खातेदारांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून दुसऱ्या बँकेत वर्गीकरण झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर कराव्यात, तसेच स्टेट बँकेचे कर्ज खात्यात जमा न झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने रक्कम देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. बैठकीत मयत शेतकऱ्यांच्या KYC संदर्भात शासनाच्या नवीन SOPनुसार पात्र वारसांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या. तसेच मुखत्यारपत्रामुळे प्रलंबित असलेल्या याद्या मागवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेत अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

