-हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ; विद्यार्थी, नागरिक, अधिकारी व सामाजिक संस्थांचा सहभाग
वर्धा (प्रकाश कथले) : राज्याच्या जलसंधारणाचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जयंती दिन तसेच जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित महा वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या या वॉकेथॉनमध्ये नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या माध्यमातून मृद व जलसंवर्धनाचा जागर करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सुरुवातीला मृद व जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी आशिष गंधे, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ जीवन कतोरे, मृद व जलसंवर्धन विभागाचे उपअभियंता सुदेश ससाने, अक्षय बेंद्रे, निकिता देशमुख आदी उपस्थित होते. वॉकेथॉन महात्मा गांधी चौक, शासकीय विश्रामगृह, नगर परिषद, कारागृह आणि पोस्ट ऑफिससमोरून मार्गक्रमण करत पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. त्यानंतर समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. महा वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रथम १० सहभागींना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वॉकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मृद व जलसंवर्धनाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय ठरला.

