-२१ पैकी १२ जागा बिनविरोध; उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात, राजकीय समीकरणांकडे लक्ष
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वसंमतीने बिनविरोध होणार, ही अटकळ अखेर खोटी ठरली आहे. २१ पैकी केवळ १२ जागांवर एकमत होऊन संचालक बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून कट्टर विरोधकही एकत्र येत सर्वसंमतीने संचालक निवडताना दिसतात. मात्र, यावेळी काही जागांवर एकमत न झाल्याने २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जालना, नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये सर्वसंमतीचे चित्र पाहायला मिळाले आहे. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथेही बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या. सुरुवातीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. उर्वरित १९ जागा बिनविरोध करण्यासाठी पुन्हा खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्ज माघारीनंतर आणखी १० जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे एकूण १२ संचालक बिनविरोध निवडून आले.
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये कामगार मंत्री डॉ. आकाशदादा फुंडकर व आमदार श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पाटील, भाजपचे नेते, आमदार संजय गायकवाड (शिवसेना शिंदे गट), जालिंदर बुधवंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), प्रसेनजित पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), पांडुरंग पाटील (शेगाव), तसेच राजेश देशमुख (नांदुरा), दिनेश काळणे (शेगाव), कावेरी सोनसळे (देऊळगाव राजा) आणि मयूर बाहेकर (बुलढाणा) यांचा समावेश आहे. एकूण २१ संचालकांपैकी १२ संचालक सर्वपक्षीय एकजुटीतून बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतल्याने उर्वरित ९ जागांचा तिढा सुटला नाही. आता या ९ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. या गटाची नेमकी ताकद किती आहे, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सहकार पॅनलने १२ जागा बिनविरोध करून आधीच आपले बहुमत निश्चित केले असले, तरी उर्वरित काही जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे सर्वसंमतीच्या धोरणाला छेद गेला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीला सिंदखेडराजा मतदारसंघातील राजकारणाची किनारही आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे मनोज कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत मनोज कायंदे अल्प मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे आपला मताधार वाढविण्यासाठी ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकीय रिंगणात उतरल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, हे सर्वश्रुत आहे. बँक वाचवण्यासाठी त्यांनी आपल्याला मिळालेली विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारून आपल्या राजकीय कारकिर्दीतील पाच वर्षे गमावली. महाराष्ट्र शासन, राज्य सहकारी बँक तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बँकेला राज्य शासनाच्या हमीवर ३०० कोटी रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळाले. याशिवाय राज्य सरकार, केंद्र सरकार आणि नाबार्डकडून सुमारे २०० कोटी रुपयांचे पुनर्भांडवलीकरण कर्ज उपलब्ध झाले.
बँकेचा ताळेबंद सुधारला
खोल आर्थिक गर्तेत सापडलेल्या जिल्हा बँकेला प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशासक तथा कार्यकारी अधिकारी डॉ. अशोकराव खरात यांनी २०१६ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. बँकेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. कठोर आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध कारभारामुळे बँकेला केवळ तोट्यातूनच बाहेर काढण्यात आले नाही, तर ती तब्बल २३ कोटी ५५ लाख रुपयांच्या नफ्यात आली. यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त झाली असून, बँकेचे पुनरुज्जीवन झाले आहे. आता शेतकरी कर्जमाफीमुळे बँकेचा ताळेबंद आणखी सुस्थितीत आणि मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानात उर्वरित ९ जागांवर कोण बाजी मारणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

