मंत्र्यांचे बंगले-गाड्या जप्त करून लिलाव करू!; रविकांत तुपकरांचा मुंबईत ‘एल्गार’, सरकारला ७ दिवसांचा अल्टीमेटम!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

७ ऑगस्टला मुंबईत तीव्र आंदोलनाची घोषणा; २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान, आयटीआरधारक आणि वंचित शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना’ आक्रमक!

बुलढाणा (बाळू वानखेडे) शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते आणि ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटींवरून तुपकरांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला असून, येत्या २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आक्रमक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. येत्या सात दिवसांत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास मुंबईत मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने जप्त करून त्यांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जून महिन्यात तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. तसेच मुंबईत विधानभवनासमोर सोयाबीन उधळणे व कापूस फेकून आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर तुपकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक त्रुटी कायम असल्याने शेतकरी अजूनही लाभापासून वंचित असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे.

तुपकरांच्या प्रमुख मागण्या:

  • प्रोत्साहन अनुदान वाढवा: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.
  • आयटीआर व पुनर्गठीत कर्जदारांचा समावेश: आयकर विवरणपत्र (ITR) भरणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच बँकांनी परस्पर कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत आणावे.
  • वंचित शेतकऱ्यांना न्याय: २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा.
  • वारसांना मदत: कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांना योजनेचा लाभ मिळावा.
  • ‘सिबिल’बाबत स्पष्टता: ‘ओटीएस’ (One Time Settlement) प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही, यासाठी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून स्पष्ट निर्देश जारी करावेत.

“नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का?” असा सवाल उपस्थित करत तुपकरांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र तीव्र संताप व्यक्त केला. “सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसतील, तर मंत्र्यांचे बंगले आणि आलिशान शासकीय वाहने विकून तो निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरावा,” असा टोला त्यांनी लगावला. येत्या २७ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईत आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू करण्याचा इशारा तुपकरांनी दिल्याने सरकार आता काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version