-लोणी नाका चौकातील हॉटेलसमोर घटना; दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा पोबारा, लोणार पोलिसांकडून तपास सुरू
लोणार (वाजिद खान) : शहरातील लोणी रोडवरील चौकात हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलेल्या कांदा बी व्यापाऱ्याच्या स्कॉर्पिओ गाडीची काच दगडाने फोडून गाडीतील साडेतीन लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना येथील व हल्ली मुक्काम केशव शिवणी येथील कांदा बी व्यापारी दिलीप माधराव खरले हे जालना येथून पांगरा डोळे येथे कांदा बी खरेदी करण्यासाठी आले होते. शहरातील शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळील हॉटेलसमोर त्यांनी एमएच २८ सीसी ५७५४ क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी लॉक करून चहापाण्यासाठी थांबले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दगडाने स्कॉर्पिओच्या चालकाच्या सीटमागील खिडकीची काच फोडली. त्यानंतर गाडीमध्ये ठेवलेली थैली चोरट्याने लंपास केली. या थैलीमध्ये सुमारे साडेतीन लाख रुपये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. चोरी केल्यानंतर चोरटा दुचाकीवर असलेल्या साथीदारासोबत घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे, गजानन डोईफोडे आणि चालक हरिभाऊ ढाकणे यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच चोरट्यांच्या शोधासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. मात्र, तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून लोणी रोडच्या दिशेने पसार झाले होते. या घटनेमुळे लोणार शहरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी दिलीप खरले यांच्या तक्रारीवरून लोणार पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३४० अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३२४ (२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास लोणार पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे करीत आहेत.

