-मृत शेतकऱ्यांच्या वारसांसह बोटांचे ठसे न उमटणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यपद्धती; आधार प्रमाणीकरणाची अडचण दूर होणार
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. मात्र, मृत शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करता येत नसल्याने तसेच काही लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने विशेष कार्यपद्धती निश्चित केली आहे. या प्रक्रियेची माहिती सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली.
तहसीलदार दिवटे यांनी सांगितले की, मृत शेतकऱ्याच्या वारसाने संबंधित बँकेकडे मृत्यू प्रमाणपत्र आणि वारसाची नोंद असलेली कागदपत्रे सादर करावीत. बँकेने कर्जखात्यात वारसाची नोंद केल्यानंतर योजनेच्या पोर्टलवरील ‘Upload Deceased Accounts’ सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड करण्यात येईल. त्यानंतर योजनेच्या निकषांनुसार संबंधित कर्जखात्यांची माहिती महाआयटीकडून संसाधित केली जाणार आहे. मृत कर्जदारास एकापेक्षा अधिक वारस असल्यास योजनेच्या निकषांनुसार कर्जाच्या रकमेतील प्रत्येक वारसाचा हिस्सा निश्चित करून पात्र वारसाच्या हिश्श्यानुसार कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येईल. मात्र, योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. प्रत्येक पात्र वारसाकडे आधार प्रमाणीकरणापूर्वी Farmer ID असणे आवश्यक असल्याचेही तहसीलदार दिवटे यांनी स्पष्ट केले.
बोटांचे ठसे न उमटल्यास तीन वेळा प्रयत्न
बोटांचे ठसे उमटत नसलेल्या लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात यादीतील विशिष्ट क्रमांक, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन उपस्थित राहावे. विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या आधारे पोर्टलवर संबंधित कर्जखात्याची माहिती तपासता येणार आहे. आधार प्रमाणीकरणावेळी एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. तीनही प्रयत्नांनंतरही प्रमाणीकरण यशस्वी न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय आपले सरकार सेवा केंद्र चालकाने वापरावा. त्यानंतर पुढील प्रक्रियेनुसार केंद्र चालकाच्या बोटाद्वारे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
तहसील कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी
प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तालुकास्तरीय समितीकडे (TLC) पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आधारकार्ड, बँकेचे पासबुक, ७/१२ उतारा आदी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली ओळख निश्चित करून घ्यावी. तालुकास्तरीय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित केली जाईल. पडताळणीनंतर आधार क्रमांक योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. “शासनाने निश्चित केलेल्या विशेष कार्यपद्धतीमुळे मृत शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना केवळ तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित प्रक्रियेचा अवलंब करावा,” असे आवाहन तहसीलदार अजित दिवटे यांनी केले.

