साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा हैदोस; दिवसाढवळ्या दोन घरे फोडली

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-सवडद येथील चोरीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात; पिंपळगाव सोनारा व हिवरा आश्रम येथील चोरटे सीसीटीव्हीत कैद

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सवडद, पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथे दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. सवडद येथील चोरीप्रकरणी गावातील नागरिकांनी संशयित राज शेनफड शिंदे व त्याची पत्नी राधा यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर पिंपळगाव सोनारा व हिवरा आश्रम येथील चोरीच्या घटनांतील संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सवडद येथील श्रीकृष्ण अण्णाराव देशमुख यांच्या आई सुनंदाबाई घराला कुलूप लावून मुलांना अंगणवाडीत घेऊन गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना घर उघडे दिसले. घरातील कपाटाची पाहणी केली असता कानातील सोन्याच्या बाळ्या, सेवनपीस, गहू पोत आदी मिळून सुमारे चार तोळे सोने, अंदाजे सहा लाख रुपये किमतीचा ऐवज तसेच ३० हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, गावात भिक्षा मागण्यासाठी फिरणारा राज शेनफड शिंदे हा घरातून बाहेर पडताना पाच वर्षांच्या गौरी नामक चिमुकलीने पाहिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गावातील काही युवकांनी राज शेनफड शिंदे व त्याची पत्नी राधा यांचा शोध घेतला असता ते गुंजमाथा शिवारात आढळून आले. युवकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, संशयितांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. तर पिंपळगाव सोनारा येथे कडूबा पुंजाजी कुऱ्हाडे यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दोन दुचाकीस्वारांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. तसेच हिवरा आश्रम येथे शिवाजी हिम्मतराव दळवी यांच्या घरात कोणी नसताना तीन दुचाकीस्वारांनी घरातून ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती आहे. पिंपळगाव सोनारा व हिवरा आश्रम येथील दोन्ही चोरीच्या घटनांतील संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याशिवाय कोराडी प्रकल्पातील दहा मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याचीही घटना समोर आली आहे. साखरखेर्डा परिसरात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दरम्यान, दुय्यम ठाणेदार संदीप मेधने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या बीट पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सवडद चोरीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित राज शेनफड शिंदे हा कुख्यात गुन्हेगार शेनफड शिंदे याचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, त्यांचा अद्याप छडा लागलेला नाही. या घटनांबाबत पोलिसांकडे माहिती विचारली असता, तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share This Article
Exit mobile version