प.पू. किरणसुधाजी, विशालप्रभाजी म.सा. यांच्या पावन सान्निध्यात लोणार येथे पूज्य प्रभाकंवरजी म.सा. जन्मशताब्दी महोत्सव संपन्न

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-भव्य वरघोडा, धार्मिक प्रवचन, गुणगौरव सभा व महाप्रसादाचे आयोजन; १६ समाजबांधवांची आठ दिवसांची तपस्या आणि ७१ जणांचे रक्तदान

लोणार (वाजिद खान) : येथील जैन संप्रदायाचे परम श्रद्धास्थान परम पूज्य प्रभाकंवरजी महाराज (म.सा.) यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लोणार शहरात विविध धार्मिक व मांगलिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला प.पू. किरणसुधाजी म.सा., प.पू. विशालप्रभाजी म.सा., प.पू. श्री सुयशप्रज्ञाजी म.सा. आणि प.पू. सौम्यप्रज्ञाजी म.सा. यांची पावन उपस्थिती लाभली. त्यांच्या मंगल सान्निध्यात शहरातून भव्य ‘वरघोडा’ काढण्यात आला.

आयोजकांच्या माहितीनुसार, जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त काढण्यात आलेला वरघोडा ‘धीरज भवन’ येथून जयघोष आणि मंगलमय वातावरणात सुरू झाला. गेलडा भवन येथून प्रताप चौक, डोंगरवाल चौक आणि बस स्टँड चौक मार्गे हा वरघोडा पुढे गेला. ठिकठिकाणी जैन श्रावक-श्राविका तसेच नागरिकांच्या वतीने वरघोड्याचे आणि पूज्य साध्वीजींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री मंगल कार्यालय येथे या भव्य रॅलीचा समारोप झाला. रॅलीच्या समारोपानंतर श्री मंगल कार्यालय येथे पूज्य साध्वीजी आणि महाराज साहेबांचे पावन चातुर्मास व धार्मिक प्रवचन, गुणगौरव सभा तसेच भव्य महाप्रसाद (स्वामीवात्सल्य) आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यास लोणार शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून सकल जैन समाजबांधव, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या जन्मशताब्दी महोत्सवाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशभाऊ मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, लोणारच्या नगराध्यक्ष मीराताई भूषण मापारी, नगरसेवक भूषण मापारी, काँग्रेस नेते नितीन शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मापारी, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभाकंवरजी म.सा. यांच्या छायाचित्राचे पोस्टल तिकीट काढण्याची मागणी

प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांचे छायाचित्र असलेले पोस्टल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

जन्मशताब्दीनिमित्त १६ समाजबांधवांची आठ दिवसांची तपस्या

जैन समाजात तपस्येला विशेष महत्त्व आहे. प.पू. प्रभाकंवरजी म.सा. यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लोणार येथील १६ समाजबांधवांनी आठ दिवस अन्नत्याग करून तपस्या केली. यामध्ये सौ. सुरेखाजी सुरेशचंद बेदमुथा, सौ. अनिताजी नवलचंदजी चोरडिया, सौ. सपनाजी रौशनजी गेलडा, सौ. कोमलजी ऋषभजी गेलडा, सौ. आरती राजेशजी छाजेड, सौ. जयाजी प्रवीणजी कोचेटा, कु. वीरती आशीषजी गुगलिया, सौ. मानसी ऋषभजी कोठारी, कु. पायल ललितजी लोढा, सौ. मानसीजी कोचेटा, श्री ऋषभजी पारसमलजी कोठारी, श्री डॉ. सिद्धार्थजी विजयजी बेदमुथा, श्री जिनेंद्रजी नवलचंदजी चोरडिया, श्री सिद्धम रौशनजी गेलडा, श्री गौरवजी संदीपजी कुचेरिया आणि श्री आयुष शरदजी लुनिया यांचा समावेश आहे.

जीनेश्वर युवा ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर

ज्ञानगंगोत्री प.पू. गुरुणी प्रभाकंवरजी म.सा. यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लोणार येथील जीनेश्वर युवा ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जीनेश्वर युवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version