-नवरात्रोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथील नवीन घाट रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे बसविण्याच्या महत्त्वपूर्ण कामास प्रारंभ झाला असून, येत्या नवरात्रोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून घाट रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर यांच्या देखरेखीखाली ठेकेदार मे. बी. जी. मुरदारे यांच्यामार्फत घाट रस्त्याचे, तर काँक्रिट रस्त्याचे काम मे. जय माता दी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नातून या महत्त्वपूर्ण कामास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. घाट रस्त्यावरील संरक्षण कठड्यांमुळे भाविकांच्या प्रवासाची सुरक्षितता वाढणार असून, नवरात्रोत्सवात मोहटादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित यंत्रणांना काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या कामासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांचे देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी आभार मानले.
दरम्यान, मोहटादेवी मंदिराच्या दर्शनवृत्तातील श्री उमा-महेश्वर देवालयात पहिल्या श्रावणी सोमवार आणि नागपंचमीनिमित्त महाअभिषेक करण्यात आला. देवस्थान समितीचे विश्वस्त श्रीकांत लाहोटी, शशिकांत दहिफळे आणि अशोक दहिफळे यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. आदिशक्ती मोहटादेवी आणि देवाधिदेव महादेवांना उत्तम पर्जन्यमानासाठी प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक विधीचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न भूषण साखरे आणि बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आणि जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी उपस्थित भाविक व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

