जिजामाता विद्यालयाच्या मागील बाजूस पाणी साचल्याने आरोग्याला धोका

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-इमारतीला धोका निर्माण; डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील जिजामाता विद्यालय गट क्रमांक ६९३ मध्ये असून, विद्यालयाच्या दक्षिण भागात पावसाचे पाणी साचत असल्याने इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाली आहे. याची दखल घेऊन पाण्याचा निचरा करण्यात यावा, अशी मागणी विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

साखरखेर्डा भागातील दक्षिणेकडील गट क्रमांक ६९३ मध्ये जिजामाता विद्यालय आहे. या माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंत सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेतात. दक्षिण भागात अनेक घरे व इमारती उभ्या राहिल्या आहेत. जुने नाल्यांचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग घरांचे बांधकाम करताना वाटेल त्या पद्धतीने वळविण्यात आले आहेत. विद्यालयाच्या मागील बाजूस वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन असून, तेथील पाणी शाळेच्या भिंतीजवळ येऊन साचत असल्याने भिंतींना ओलावा निर्माण झाला आहे. काही खोल्यांमध्येही पाणी शिरत आहे. त्यामुळे भिंतींना तडे जाऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याची तातडीने दखल घेऊन तहसीलदार तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

Share This Article
Exit mobile version