आजपासून राज्यातील शाळा सुरु; विद्यार्थी मात्र पुस्तकाविना
बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. मात्र शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तकेच नाहीत. राज्य भरात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला असून, बालभारतीकडून काहीही प्रतिसाद दिला जात नाही. राज्यभरातील विक्रेते व पालकवर्ग पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा करत आहेत. आज विद्यार्थी शाळेत गेले खरे पण त्यांना शिकवायचे कसे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
महाराष्ट्रातील इयत्ता १ ते १२ च्या शाळा आजपासून कोविड-१९ प्रोटोकॉलसह पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत, असे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. गेल्याच आठवड्यात राज्य सरकारने जिल्हा परिषदांना त्यांच्या संबंधित भागातील कोविड-१९ परिस्थितीचे मूल्यांकन करुन शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.
एकीकडे शाळा सुरु झाल्या असल्या तरी, पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः इंग्लिश आणि सेमी इंग्लिश माध्यमांची पुस्तके मिळालेली नाहीत. काही शाळांनी पालकांकडून पैसे घेतले आहेत. मात्र, पुस्तके देण्यात आलेली नाही. बालभारतीकडे वारंवार विचारणा करूनही पुस्तकं उपलब्ध होत नसल्याची तक्रार विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. पुस्तकांअभावी शिकवायचे कसे, असा पेच राज्यात निर्माण झालेला आहे.
शाळांची घंटा वाजली; पुस्तकं कुठंय?

