बिबी पोलिसांच्या तत्परतेने व्यक्तीला मिळाले जीवदान

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; कुटुंबीयांसह नागरिकांकडून कौतुक

बिबी (ऋषी दंदाले) : सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक १२ ऑगस्ट २०२६, बुधवार रोजी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरवरून परतीच्या प्रवासात बिबी येथे मुक्कामी येत आहे. अशातच बिबी पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिंडी बंदोबस्ताच्या कामी पेट्रोलिंग करीत असताना वसंतराव नाईक शाळेच्या गेटसमोर उभे होते. त्यावेळी त्यांच्या समोरील एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीला पोलिस ठाण्याच्या वाहनातून जवळच असलेल्या डॉ. सानप यांच्या दवाखान्यात दाखल केले.

डॉक्टरांनी त्या व्यक्तीची तपासणी करून तातडीने पुढील उपचार सुरू केले. उपचार मिळाल्यामुळे आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये चालक अंभोरे, मोहिते मेजर, जयवंल व राठोड यांनी तत्परता दाखवत माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असताना माणुसकीचेही दर्शन घडविले. ‘खाकीतील देवमाणसां’च्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.

Share This Article
Exit mobile version