– सहकारात ‘राजकीय जोडे’ बाहेर ठेवण्याची परंपरा मोडीत? बुलढाणा जिल्हा बँकेत अजित पवार गटाचे दंड थोपटले!
– स्व. भास्करराव शिंगणे परंपरेला सुरुंग; अजित पवार गटाच्या भूमिकेमुळे उर्वरित जागांवर मतदान
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या ‘सहकार पॅनेल’ने सुरुवातीलाच वर्चस्व सिद्ध केले असून, तब्बल १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. बँकेची स्थिरता आणि सहकार चळवळीची परंपरा जपण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बिनविरोध निवडीची रणनीती यशस्वी ठरत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आक्रमक भूमिकेमुळे पूर्ण बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे सहकार वर्तुळात अजित पवार गटाचा हा पवित्रा केवळ राजकीय विरोध आहे की दबावतंत्र, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
बिनविरोध निवडून आलेले प्रमुख संचालक:
- सिंदखेडराजा: डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
- मेहकर: प्रतापराव गणपतराव जाधव
- चिखली: अंकुशराव व्यंकटेश पाटील
- बुलढाणा: मयुर गणेश बाहेकर
- खामगाव: दिनेश राजाराम काळे
- शेगाव: पांडुरंग पुरुषोत्तम पाटील
- देऊळगाव राजा: कावेरी समाधान सोनसळे
- मोताळा: संजय रामभाऊ गायकवाड
- नांदुरा: राजेश रमेशराव देशमुख
- जळगाव जामोद: प्रसन्नजित तायडे पाटील
- इतर गट: जालिंदर आश्रुबा बुधवत व आकाश पांडुरंग फुंडकर
जिल्ह्यात सर्वपक्षीय सहमतीचे वातावरण तयार झालेले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी काही जागांवर निवडणूक लढवण्याचा ठाम पवित्रा घेतला आहे. “सहकार क्षेत्रात काम करताना राजकीय जोडे बाहेर ठेवावे लागतात,” ही स्व. भास्करराव शिंगणे यांनी घालून दिलेली परंपरा मोडीत काढून ही निवडणूक राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी लादली जात आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीतील राजकीय वैमनस्याचे पडसाद आता सहकार क्षेत्रात उमटत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.
उर्वरित जागांवर औपचारिक लढत?
विकास सोसायटी मतदारसंघातील लोणार, संग्रामपूर व मलकापूर हे ३ तालुके, महिला राखीव २ जागा आणि इतर राखीव ४ जागा अशा उर्वरित जागांसाठी आता मतदान प्रक्रिया पार पडेल. मात्र, २१ पैकी १२ महत्त्वाच्या जागा आधीच बिनविरोध झाल्यामुळे आणि बँकेवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाचा असलेला मजबूत प्रभाव पाहता, उर्वरित जागांवरील ही लढत केवळ औपचारिकता ठरणार की अजित पवार गट काही चमत्कार घडवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

