-स्वीकृत सदस्यपदी दीपक खेडकर व शबाना मणेर यांचीही बिनविरोध निवड
देहू (अर्जुन मेदनकर) : देहू नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदी योगेश काळोखे, तर स्वीकृत सदस्यपदी दीपक खेडकर आणि शबाना मणेर यांची सोमवारी (दि. १०) झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड जाहीर झाली. हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने सभेच्या अध्यक्षस्थानी होते. देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, गटनेते योगेश परंडवाल, नगरपंचायत सदस्य मयूर टिळेकर, मयूर शिवशरण, सदस्य ज्योती टिळेकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.
नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ येत्या सहा महिन्यांत पूर्ण होत असला, तरी शेवटचे सहा महिने कामकाज पाहता यावे आणि उपाध्यक्षपद मिळावे, यासाठी अनेक जण इच्छुक होते. तसेच स्वीकृत सदस्यपदासाठीदेखील कामकाजाची संधी मिळावी, यासाठी अनेकजण इच्छुक होते. देहू नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची सत्ता असून, १७ पैकी १७ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. देहू नगरपंचायतीच्या विद्यमान सदस्यांची मुदत येत्या सहा महिन्यांत संपत आहे. नुकताच प्रियंका मोरे यांनी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच इतर दोन स्वीकृत सदस्यांनीही सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी नगरपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्षपदासाठी योगेश काळोखे यांचा एकमेव अर्ज, तर स्वीकृत सदस्यांच्या दोन जागांसाठी दीपक खेडकर आणि शबाना मणेर यांचे अर्ज प्राप्त झाले. निर्धारित जागांसाठी मर्यादित अर्ज प्राप्त झाल्याने प्रांताधिकारी डॉ. माने यांनी तिघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.