बुलढाणा जिल्हा बँकेवर कब्जाचा सर्वपक्षीय कट?; आ. मनोज कायंदेंचा शिंगणे-जाधव गटाला थेट शह!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– १६ वर्षांनंतर बँकेत महासंग्राम! बड्या नेत्यांची नाकाबंदी भेदत मनोज कायंदे मैदानात!
– सर्वपक्षीय एकजूट मोडीत; ९ जागांसाठी आ. मनोज कायंदेंनी ‘दंड थोपटले’!

बुलढाणा (बाळू वानखेडे) : तब्बल १६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेली बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची (BDCC Bank) निवडणूक आता अत्यंत रंजक व रंगात आली आहे. बँक ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्यातील मातब्बर सर्वपक्षीय नेते एकत्र आले असले, तरी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांना डावलल्याने निवडणुकीतील ‘बिनविरोध’ची चर्चा फिस्कटली आहे. आ. कायंदे यांनी सहकार पॅनलविरोधात थेट ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून निवडणुकीचे दंड थोपटले असून, यामुळे बँकेच्या रणसंग्रामात जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नुकतीच खामगाव येथे जिल्ह्यातील प्रमुख सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली होती. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’ने बहुतांश जागांवर ताबा मिळवण्याची व्युहरचना आखली होती. या नेत्यांच्या तडजोडीच्या राजकारणामुळे २१ संचालक पदांपैकी तब्बल १२ जागांवर उमेदवार अविरोध निवडून आणण्यात यश आले. मात्र, या सर्व राजकीय तडजोडींमध्ये आ. मनोज कायंदे यांना विश्वासात न घेता डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचे सूर उमटले.

नेत्यांच्या या एकतर्फी रणनीतीला उत्तर देत आ. मनोज कायंदे यांनी ८ मतदारसंघांतील उर्वरित ९ संचालक पदांसाठी आपले ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता थेट आमनेसामने लढली जाणार आहे. सत्ताधारी ‘सहकार पॅनल’ विरुद्ध ‘परिवर्तन पॅनल’ असा थेट सामना रंगणार असल्याने जिल्ह्याचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

निवडणुकीचा पुढील कार्यक्रम:

  • अंतिम यादी व चिन्ह वाटप: १२ ऑगस्ट
  • मतदान: २३ ऑगस्ट
  • मतमोजणी व निकाल: २४ ऑगस्ट

उद्या, १२ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन चिन्हांचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कोणाचे राहणार आणि बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This Article
Exit mobile version