संत सावता माळी पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा; पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-टाळ-मृदंगाच्या गजरात साखरखेर्डा नगरीतून भव्य पालखी मिरवणूक; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरती व महाप्रसादाचे आयोजन

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साखरखेर्डा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात संत सावता माळी यांचा भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. या पालखी सोहळ्यात शेकडो महिला, वारकरी आणि समाजबांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

११ ऑगस्ट रोजी संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त साखरखेर्डा येथील महात्मा फुले नगरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिरातून संत सावता माळी यांच्या पालखीची मिरवणूक साखरखेर्डा नगरीतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा जयघोष आणि संत सावता माळी यांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

पालखी सोहळ्यात शेकडो महिला तसेच वारकरी संप्रदायातील भाविक संत सावता माळी यांचे अभंग गात सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी महिला व पुरुषांनी पालखीचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. अनेक भजनी मंडळांनीही या मिरवणुकीत सहभाग घेतला. या पालखी सोहळ्याचे आयोजन ह.भ.प. राजू खराडे, ह.भ.प. दत्ता शिंदे, प्रणव मंडळकर आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दगडूबा दानवे यांनी केले होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, वसंत नन्हई यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. पालखी सोहळ्यानंतर दुपारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.

Share This Article
Exit mobile version