बुलढाणा जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर योजनेचे २९५ कोटी ‘खात्यात’; ३० हजार शेतकरी लाभापासून वंचित!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– आधार प्रमाणीकरण न झाल्याने निधी तुटपुंज्या टप्प्यात; शासनाकडून तातडीने ई-सेवा केंद्रात जाण्याचे आवाहन

बुलढाणा (बाळू वानखेडे) : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २९५.४७ कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यभरातील ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५,०२९ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील उर्वरित ३० हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी असल्याने त्यांना या लाभापासून दूर राहावे लागले आहे.

जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण १ लाख १५ हजार ५१६ शेतकरी पात्र ठरले आहेत. यांपैकी आतापर्यंत ८५ हजार ४५३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर ३० हजार ६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. पहिल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे, त्यांनी ते पूर्ण करताच लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यावर जमा केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी तत्काळ जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणीकरण अडकले असल्यास, ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने जिल्हा अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागावी, असा सल्ला पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.


खरीप पीक कर्जाचे तत्काळ वाटप करा

दरम्यान, कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने बँकांना दिले आहेत. बँकांनी पीक कर्ज वाटपाचे नियोजन पूर्ण केले असून, शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अग्रेसर बँक व्यवस्थापकांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version