-लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, पार्किंग व दर्शन व्यवस्थेचे नियोजन
पुणे (अर्जुन मेदनकर) : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या नियंत्रणाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी श्रावण महिन्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, भाविकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी करण्यावर भर दिला. श्रीक्षेत्र भीमाशंकरची धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या असलेली महत्त्वपूर्ण ओळख लक्षात घेता, भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

