अलंकापुरी माऊली मंदिरात संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा परंपरेने उत्साहात

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-नामजयघोष, कीर्तन आणि महाप्रसादाने रंगला सोहळा; वारकरी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

आळंदी (गोविंद ठाकूर तौर) : अलंकापुरी आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि हरिनाम जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माऊली मंदिरात सर्व संतांचे समाधी सोहळे व पुण्यतिथी उत्सव सर्व समाजाने एकत्र येऊन साजरे करण्याच्या उपक्रमांतर्गत संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा परंपरेनुसार आयोजित करण्यात आला.

या निमित्ताने संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे आणि संयोजक मोहन महाराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामजयघोष आणि पंचपदीचा कार्यक्रम झाला. संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त रामचंद्र महाराज सारंग यांनी सुश्राव्य कीर्तनसेवा सादर केली. ‘ऐसा भाग्य झालो! तरी धन्य जन्मा आलो!!’ या अभंगावर त्यांनी हृदयस्पर्शी निरूपण करत संत नामदेव महाराजांच्या जीवनकार्यावर आणि संत साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला. कीर्तनातून संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सहवासातील अनेक प्रसंग तसेच संत नामदेव महाराजांनी पंजाबमधील घुमान परिसरापर्यंत वारकरी संप्रदायाची पताका पोहोचवत केलेल्या प्रचार-प्रसाराची माहिती देण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंगांचे दाखले देत त्यांच्या संत साहित्याचा आणि भक्तीपरंपरेचा परिचय करून देण्यात आला. कीर्तनाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कीर्तनसेवेला श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील मृदुंगमणी साहिल उत्तेकर आणि सिद्धार्थ रांजणे या बाल वारकरी कलाकारांनी साथसंगत केली. गायक अक्षय महाराज कडू, दुर्वेश वैद्य तसेच संस्थेतील आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.

श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वर्षभर सर्व संतांचे समाधी दिन व पुण्यतिथी सोहळे साजरे केले जात असून, या उपक्रमातून नवोदित कीर्तनकारांना कीर्तनसेवेची संधी मिळत आहे. संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त संस्थेतील ज्या मुला-मुलींनी संपूर्ण हरिपाठ पाठ केला आहे, अशा विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीच्या अमेरिकन स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, रवींद्र महाराज कुमकर, सुशीला शिंदे, अक्षय कडू तसेच राजगड तालुक्यातील वारकरी आणि भाविक उपस्थित होते. सोहळ्याची सांगता संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ या नामजयघोषात करण्यात आली. यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज भक्तनिवास येथे भाविकांसाठी महाप्रसादाची सेवा करण्यात आली.

Share This Article
Exit mobile version