उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना शेलसूरचे सुपुत्र पॅरा कमांडो हरिदास कापसे यांना वीरमरण; चिखलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

आश्रूभिजल्या डोळ्यांनी चिखलीकरांचा अखेरचा निरोप!

चिखली (अंकुश पाटील): देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, भारतीय सैन्यातील धाडसी पॅरा कमांडो हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांना उत्तराखंड येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. आज, सोमवारी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर हजारो नागरिकांच्या आणि देशप्रेमींच्या उपस्थितीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मूळचे तालुक्यातील शेलसूर येथील रहिवासी होते.

वीर जवान हरिदास कापसे यांचे पार्थिव चिखलीत दाखल झाल्यानंतर दांडगे ले-आऊट येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंतिम यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा सिद्ध सायन्स चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बसस्थानक मार्गे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आबालवृद्धांनी या वीरपुत्रावर पुष्पवृष्टी केली. ‘अमर रहे, अमर रहे, हरिदास कापसे अमर रहे’ आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने संपूर्ण चिखली शहर दुमदुमून गेले होते.

या अंत्ययात्रेला आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, चिखलीचे नगराध्यक्ष पंडित देशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस प्रशासन, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिदास कापसे यांच्या पश्चात वडील मधुकर शंकर कापसे, मोठे बंधू ओमप्रकाश, मधले बंधू ज्ञानेश्वर, पत्नी वृषाली कापसे, मुलगा ऋग्वेद आणि मुलगी वैदेही असा परिवार आहे. तीन महिन्यांपूर्वीच (१७ एप्रिल २०२६) त्यांच्या आई उषाबाई यांचे निधन झाले होते. स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या आणि भारताच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती देणाऱ्या या अमर जवानाच्या त्यागाला संपूर्ण देश आणि चिखली शहर आदरांजली वाहत आहे.


स्वातंत्र्यदिनी जन्म अन् देशसेवेची आवड

हरिदास कापसे यांचा जन्म १५ ऑगस्ट १९९० रोजी झाला. लहानपणापासूनच शिस्त आणि धाडसाची आवड असलेल्या हरिदास यांनी २४ डिसेंबर २०१० रोजी भारतीय सैन्यात प्रवेश केला. सुरुवातीच्या कठीण प्रशिक्षणानंतर त्यांनी भारतीय सैन्यातील अत्यंत खडतर मानले जाणारे ‘पॅरा कमांडो’ (PARA COMMANDO) प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. ते भारतीय सैन्यदलातील ४२१ पॅरा फिल्ड कंपनीमध्ये कार्यरत होते.


जम्मू-काश्मीरमधील शौर्य अन् पुरस्कार

आपल्या १६ वर्षांच्या सैनिकी कारकिर्दीत त्यांनी अत्यंत आव्हानात्मक भागांत काम केले:

  • २०१४ ते २०१७ व २०२१ ते २०२४: जम्मू-काश्मीरमधील ३१ राष्ट्रीय रायफल्स (RR) मध्ये सेवा बजावताना त्यांनी अनेक दहशतवादविरोधी कारवायांमध्ये भाग घेतला.
  • शौर्य सन्मान: गुरिल्ला ऑपरेशनमधील विशेष कामगिरीबद्दल त्यांना लेफ्टनंट जनरल सायटेशन (General Citation) तसेच मध्य कमांडकडून (Central Command) शौर्य सायटेशन देऊन गौरवण्यात आले होते.
  • इतर मोहिमा: २०१७ ते २०२० दरम्यान आग्रा व अंदमान-निकोबार बेटांवरील विशेष मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.

बचावकार्यात दाखवले धाडस

उत्तर प्रदेशात झालेल्या एका बोट दुर्घटनेदरम्यान नदीच्या भीषण प्रवाहातून ११ मृतदेह बाहेर काढण्याच्या अत्यंत धोकादायक बचाव मोहिमेत (Rescue Operation) हरिदास यांनी ३-४ दिवस अथक प्रयत्न करून मोलाची भूमिका बजावली होती. अशाच प्रकारे आव्हानात्मक परिस्थितीत सैनिकी कर्तव्य बजावताना त्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला.

Share This Article
Exit mobile version