-आषाढी पायी वारी संपन्न: लाखो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुकांचे संजीवन समाधी मंदिरात पुनरागमन
आळंदी (अर्जुन मेदनकर): आषाढी पायी वारी सोहळ्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे पारंपरिक रीतीने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा आळंदीत परतला. यावर्षी राज्यभरातून आलेल्या लाखो भक्तांच्या जनसागरासह पायी वारी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
पारंपरिक सोपस्कार आणि मंदिरात विसावा
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आळंदी मंदिरात पोहोचल्यानंतर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर आणि ऋषिकेश आरफळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींच्या पादुका आळंदी देवस्थानकडे सुपूर्द करण्यात आल्या. मंदिरात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर वीणा मंडपातून माऊलींच्या गाभाऱ्यात महाआरतीने सोहळा विसावला. तत्पूर्वी, माऊली मंदिरातून श्रींच्या स्वागतासाठी दिंडी हरिनाम गजरात सामोरी गेली आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला. अभंग गायन आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सोहळ्याचे स्वागत झाले.
देवस्थान आणि प्रशासकीय मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथ, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, वेदमूर्ती अवधूत महाराज चक्रांकित, हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरू, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर, संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, सचिन घुंडरे, विवेक घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महादेव रत्नपारखी, अप्पाबुवा महाराज पाटील यांच्यासह अनेक मानकरी, दिंडीकरी व वारकरी भाविक उपस्थित होते.
संजीवन समाधी मंदिरात पादुका आल्यानंतर मुख्य आरती संपन्न झाली. यावर्षी वारीवर कोणतेही निर्बंध नसल्याने नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले.
रांगोळ्यांच्या पायघड्या, पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद वितरण
आळंदी शहरात पालखीच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या आणि पुष्पसजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या मूळपीठावर ह.भ.प. अवधूत महाराज चक्रांकित व परिवाराच्या वतीने पिठलं-भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अनेक दिवसांच्या विरहानंतर माऊलींची पालखी शहरात परतल्याने संपूर्ण आळंदीत नवचैतन्य अवतरले होते. याप्रसंगी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दुतर्फा उभे राहून सोहळ्याचे स्वागत केले. उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले की, मुबलक पाणी, अन्न आणि आरोग्य व्यवस्थेमुळे सोहळा अतिशय सुलभतेने पार पडला.
थोरल्या पादुका मंदिरात विशेष सत्कार
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी सोहळ्याचे स्वागत केले. या प्रसंगी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चौधरी यांचा शाल, श्रीफळ व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, ह.भ.प. रमेश महाराज घोंगडे आदी उपस्थित होते. आळंदी व दिघी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
‘स्वच्छता वारी’ उपक्रम आणि विविध सेवाभावी संस्थांचे योगदान
या वर्षीच्या पंढरपूर वारीत स्वच्छता अभियानाचा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला. “एक तरी ओवी अनुभवावी” या धर्तीवर भक्तांनी “आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी” असा आत्मिक आनंद घेतला. स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व सेवकांचे दिलीप महाराज ठाकरे यांनी आभार मानले. तसेच आवेकर भावे रामचंद्र संस्थान (श्री राम मंदिर), लक्ष्मी नारायण श्री विष्णू मंदिर, श्री हरिहरेंद्र महाराज मठ, सद्गुरू श्री साखरे महाराज मठ व माऊली अन्नछत्र मंडळाच्या वतीने पालखीचे स्वागत करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. माऊली अन्नछत्र मंडळाचे हे सेवेचे ३५ वे वर्ष (१९९१ पासून) असल्याचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले.
‘नादब्रह्म शिल्पा’चे उद्घाटन
नगरपरिषदेच्या वतीने दगडी पुलाच्या सुरुवातीला विकसित करण्यात आलेल्या ‘नादब्रह्म शिल्प’चे समस्त वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत हरिनाम गजरात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, गटनेते सचिन गिलबिले आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

