-२६० रुग्णांची तपासणी; ७० जणांना मोफत चष्मे, तर २२ मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी संतोष परिहार यांनी स्वीकारली
चिखली (राजेंद्र घुबे) : राजकीय व सामाजिक कार्यासोबतच समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिखली तालुकाध्यक्ष संतोष परिहार यांचा वाढदिवस ८ ऑगस्ट २०२६ रोजी अंचरवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यदायी उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात तब्बल २६० रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी
शिबिरात रुग्णांची अचूक व सखोल तपासणी व्हावी यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने सेवा दिली. जिल्हा नेत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. भिलावेकर (M.S.), डॉ. खेडेकर, सीएचओ परमेश्वर परिहार, नेत्रचिकित्सा अधिकारी श्रीमती हिवराळे, सवडतकर, गाडेकर, पोळ तसेच आरोग्य सेविका पोफळे व देवरे यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला.
७० रुग्णांना मोफत चष्मे; २२ जणांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी
शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या २६० रुग्णांपैकी ७० रुग्णांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदान झाले. या सर्व रुग्णांना संतोष परिहार यांच्या वतीने लवकरच मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. तसेच २२ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले असून, या सर्व रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी संतोष परिहार यांनी स्वीकारली आहे.
वाढदिवसाच्या उपक्रमाचे कौतुक
उद्घाटनप्रसंगी हभप श्री. जगदीशचंद्र महाराज यांनी संतोष परिहार यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. अध्यक्षीय भाषणात शंतनू बोंद्रे म्हणाले की, वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ बॅनर आणि फ्लेक्स लावण्याऐवजी गरजू आणि वयोवृद्ध रुग्णांच्या डोळ्यांची काळजी घेण्याचा उपक्रम राबविणे ही समाजाप्रती असलेली खरी बांधिलकी आहे. तपासणीसोबतच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारणे ही संतोष परिहार यांच्या सामाजिक संवेदनशीलतेची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम
संतोष परिहार हे राजकीय पदापुरते मर्यादित न राहता सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापूर्वी वटपौर्णिमेचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी विविध गावांतील महिलांना १०१ वडाच्या रोपांचे मोफत वाटप केले होते. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून जनसेवेत कार्यरत असलेल्या संतोष परिहार यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

