‘सेतू केंद्रातून तक्रार नोंदवा; TLC पोर्टलवर प्राप्त होताच तातडीने दखल घेऊन निवारण करू’ – तहसीलदार अजित दिवटे

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-कर्जमाफीतील e-KYC, आधार प्रमाणीकरण, वारस नोंद, कर्ज रकमेतील तफावत यांसह सर्व तक्रारींसाठी प्रशासनाची विशेष यंत्रणा सक्रिय

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (e-KYC) सुरू असताना सिंदखेडराजा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. वृद्ध शेतकऱ्यांचे फिंगरप्रिंट जुळत नसणे, आजारी व अपंग लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे कठीण होणे, मृत कर्जदारांच्या वारसांना लाभ मिळवून देण्याच्या प्रक्रियेबाबत संभ्रम तसेच कर्ज रकमेतील तफावत आणि आधार-बँक नोंदीतील विसंगती यामुळे काही प्रकरणे रखडली आहेत.

योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून त्याची पावती संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वृद्ध शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे मशीनवर उमटत नसल्याने त्यांचे e-KYC पूर्ण होत नाही. आजारपण, अपंगत्व किंवा वृद्धापकाळामुळे काही लाभार्थ्यांना आधार केंद्रावर प्रत्यक्ष जाणेही शक्य होत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्जमाफीच्या पात्र यादीतील काही कर्जदारांचे निधन झाले असून, त्यांच्या कायदेशीर वारसांना लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व कार्यपद्धतीबाबत स्पष्ट माहिती नसल्याने संबंधित कुटुंबीय संभ्रमात आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेतील तफावत, आधार क्रमांक आणि बँक नोंदींमधील विसंगती यामुळेही कर्जमाफीची प्रक्रिया रखडत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत.

सेतू केंद्रातून तक्रार नोंदविण्याचे आवाहन

या पार्श्वभूमीवर तालुका तक्रार समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अजित दिवटे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कर्जमाफी प्रक्रियेत कोणतीही अडचण असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू (महा ई-सेवा) केंद्रावर जाऊन तक्रार नोंदवावी. सेतू केंद्रामार्फत ही तक्रार TLC पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. तक्रार पोर्टलवर प्राप्त होताच तिची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करून ती निकाली काढली जाईल, असे तहसीलदार दिवटे यांनी स्पष्ट केले.

फिंगरप्रिंट किंवा थंब जुळत नसणे, e-KYC पूर्ण न होणे, मृत कर्जदारांच्या वारसांशी संबंधित अडचणी, कर्ज रकमेतील तफावत, आधार व कर्ज नोंदीतील विसंगती तसेच कर्जमाफी प्रक्रियेशी संबंधित इतर कोणतीही समस्या असल्यास ती अधिकृतपणे सेतू केंद्रातून नोंदवावी. प्रत्येक तक्रारीची स्वतंत्रपणे छाननी करून संबंधित यंत्रणेमार्फत तातडीने निराकरण केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले. सहाय्यक निबंधक शेळके हे तालुका तक्रार समितीचे सदस्य सचिव असून पवार हे सहाय्यक निबंधक कार्यालयातील कामकाज पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींचा नियमित आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला दोन बैठका घेतल्या जात असून, प्राप्त तक्रारींच्या निवारणासाठी महसूल, सहकार, बँका आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

पात्र शेतकरी तसेच मृत कर्जदारांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या तक्रारी वेळेत दाखल कराव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्याला कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदार अजित दिवटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फिंगरप्रिंट न उमटणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी आधार प्रमाणीकरणाची प्रभावी व्यवस्था, वारसांच्या प्रकरणांसाठी सुलभ कार्यपद्धती आणि तांत्रिक अडचणींचे त्वरित निराकरण झाल्यास कर्जमाफीची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Share This Article
Exit mobile version