कर्जुने खारेच्या शाळेचा माजी विद्यार्थीच ठरला विद्यार्थिनींसाठी ‘पॅडमॅन’

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशनचा पुढाकार; सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशीनची सुविधा, १५० विद्यार्थिनींना मोफत पॅडचे वाटप

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : कर्जुने खारे येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि Höganäs India Pvt. Ltd. यांच्या CSR सहकार्याने आयोजित ‘स्वास्थ्य सखी – Women Hygiene Awareness and Health Program’ अंतर्गत शाळेत सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल (इन्सिनरेटर) मशीन बसविण्यात आले. यासोबतच सुमारे १५० विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके हे याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या शाळेतील विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, या सामाजिक जाणिवेतून त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यांच्या या पुढाकारामुळे परिसरात त्यांची विद्यार्थिनींसाठी ‘पॅडमॅन’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

कार्यक्रमात सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी सौ. छायाताई निमसे आणि डॉ. पल्लवी जाधव यांनी किशोरवयीन विद्यार्थिनींशी संवाद साधत मासिक पाळीविषयी वैज्ञानिक माहिती दिली. मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रिया असून, त्याबाबतचे अंधविश्वास, गैरसमज, लाज आणि भीती दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, नियमित सॅनिटरी पॅडचा वापर आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले. शाळेत बसविण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनमुळे विद्यार्थिनींना गरजेच्या वेळी तातडीने सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार आहेत. तसेच डिस्पोजल मशीनमुळे वापरलेल्या पॅडची स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यासोबतच शाळेतील स्वच्छता राखण्यासही मोठी मदत होणार आहे. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी घेतलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत असून, अशा उपक्रमांमुळे किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

Share This Article
Exit mobile version