महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी यशस्वी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

प्रकृती स्थिर; अहिल्यानगरच्या इंपल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, भाविकांनी भेटीसाठी रुग्णालयात येणे टाळण्याचे आवाहन

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री यांना अचानक छातीत त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील इंपल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती श्री क्षेत्र भगवानगडाच्या वतीने देण्यात आली आहे.

शस्त्रक्रियेनंतर डॉ. नामदेव महाराज शास्त्री डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. डॉ. सुहास हरदास, डॉ. संदीप गाडे आणि डॉ. महेश घुगे यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू असून, शास्त्रीजी उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस रुग्णालयात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शास्त्रीजींवर उपचार सुरू असल्याने भाविक, भक्त आणि हितचिंतकांनी रुग्णालयात भेटीसाठी गर्दी करू नये तसेच भेटीसाठी आग्रह धरू नये, असे आवाहन भगवानगडाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने सध्या विश्रांती अत्यावश्यक असल्याने रुग्णालय प्रशासन किंवा संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना भेटण्याची विनंती करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शास्त्रीजींच्या उपचारात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. त्यामुळे भाविकांनी रुग्णालयात प्रत्यक्ष येण्याऐवजी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुटीनंतर भगवानगडावर भाविकांना भेटणार

डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर ते श्री क्षेत्र भगवानगड येथे भाविकांना भेटणार आहेत. त्यांची भेट कधी आणि कोणत्या दिवशी होणार, याबाबतची तारीख त्यांच्या प्रकृतीचा विचार करून नंतर अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी, असे भगवानगडाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वैद्यकीय पथकाचे विशेष आभार

डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर तातडीने उपचार करून ॲन्जिओप्लास्टी यशस्वी करणारे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासन यांच्या सेवाभावाबद्दल श्री क्षेत्र भगवानगड परिवाराच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. शास्त्रीजींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि ते पुन्हा भगवानगडावर भाविकांच्या सेवेत रुजू व्हावेत, यासाठी भगवानगड परिवारासह असंख्य भाविकांकडून प्रार्थना केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version