-हरिनामाच्या जयघोषाने वडमुखवाडी परिसर दुमदुमला; महापूजा, आरती व प्रसादाचे आयोजन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी-पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात हरिनामाच्या जयघोषात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. पंढरपूरहून आळंदीकडे परतणाऱ्या माऊलींच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याने मंदिरात विसावा घेतला. यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोढे कबीरबुवा, विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब रंधवे चोपदार आदी मान्यवर उपस्थित होते. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मानकरी राहुल चिताळकर, योगेश आरु, स्वकाम सेवेचे धनंजय गावडे, दामोदर तापकीर, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्यामुळे वडमुखवाडी परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

