तळेगाव परिसरातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच मिळणार सर्वोत्तम आरोग्य सुविधा

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; तळेगावच्या ३०० खाटांच्या रुग्णालयासह आष्टी उपसा सिंचन प्रकल्पाचे भूमिपूजन

वर्धा (प्रकाश कथले) : तळेगाव (शामजीपंत) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ३०० खाटांच्या रुग्णालयामुळे आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यांसह परिसरातील नागरिकांना नियोजित रुग्णालयातच अद्ययावत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नातून हे रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे काम शासन करणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

तळेगाव येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या ३०० खाटांच्या रुग्णालयासह उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरिता गाखरे, महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे, संजय गाते, सुधीर दिवे आदी उपस्थित होते. मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेवर कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले, तर आष्टी उपसा सिंचन योजनेचे ई-भूमिपूजन करण्यात आले. आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील नागरिकांना सध्या उपचारासाठी वर्धा किंवा नागपूर येथे जावे लागते. तळेगाव येथे रुग्णालय सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील. तसेच आष्टी तालुक्यातील काही गावांतील सिंचनाचा पाण्याचा प्रश्न आष्टी उपसा सिंचन प्रकल्पामुळे सुटणार असून, संबंधित गावांना बारमाही पाणी उपलब्ध होईल, असे आमदार सुमित वानखेडे यांनी सांगितले.

तळेगाव येथे सुमारे ३० हजार ९९ चौरस मीटर क्षेत्रावर १५५ कोटी ८४ लाख रुपये खर्चून ३०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णालय व प्रशासकीय इमारत तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने राहणार आहेत. रुग्णालयात पाणीपुरवठा, पावसाचे पाणी संकलन व्यवस्था, वातानुकूलित लिफ्ट, सीसीटीव्ही, शवागार, सुरक्षा कक्ष, पंपगृह, विद्युत उपकेंद्र, ऑक्सिजन शेड, वैद्यकीय गॅस पाइपलाइन, चार अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, लिक्विड ऑक्सिजन टँक, पार्किंग आणि अंतर्गत रस्त्यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या तीन मजली रुग्णालयात नोंदणी विभाग, बाह्यरुग्ण विभाग, माता व बाल आरोग्य विभाग, आपत्कालीन विभाग, रेडिओलॉजी, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, औषध वितरण विभाग, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड, बर्न वॉर्ड, अतिदक्षता विभाग, महिला संसर्गजन्य रोग विभाग, रक्तपेढी आणि निर्जंतुकीकरण विभाग आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार स्थानिक स्तरावरच मिळणार आहेत.

आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे २ हजार ५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

मोर्शी येथील उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही योजना उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर साखळी क्रमांक १८ हजार ३०० मीटरवर स्थित आहे. या योजनेअंतर्गत दोन पंपगृहे उभारण्यात येणार आहेत. पंपगृह क्रमांक दोनच्या वितरण कुंडातून आष्टी येथील १५५ हेक्टर तसेच थार, किन्ही, करोला, चामला, बोरखेडी, नागझिरी, बांबर्डा, बोटोणा, वाघोडा, वाडी, पळसोना, सारवाडी आणि तरोडा या गावांतील १ हजार ९०३ हेक्टर, असे एकूण २ हजार ५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेमुळे संबंधित गावांतील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून, शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. परिणामी शेती उत्पादनाला चालना मिळण्याबरोबरच जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघण्यास मदत होणार आहे.

Share This Article
Exit mobile version