शून्यातून विश्व निर्माण करण्याची हातोटी असलेले व्यक्तिमत्त्व बाळासाहेब उर्फ सखाराम पवार अनंतात विलीन

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-साखरखेर्डा परिसरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या निधनाने हळहळ; प्रतिकूल परिस्थितीतही उभा केला कर्तृत्वाचा संसार

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मराठवाड्यातील लातूर भागातून उदरनिर्वाहासाठी साखरखेर्डा येथे आलेले आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारे सामान्यांतील असामान्य व्यक्तिमत्त्व बाळासाहेब उर्फ सखाराम कृष्णाजी पवार यांचे अल्पशा आजाराने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रांतील नागरिकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

बाळासाहेब पवार म्हटले की, धिप्पाड देहयष्टीचे, मनमिळाऊ आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचे वडील कृष्णाजी पवार कामाच्या शोधात साखरखेर्डा येथे आले आणि याच गावाला त्यांनी आपले कर्मभूमी बनविले. बाळासाहेब पवार यांनी सुरुवातीच्या काळात एसटी बस सेवा सुरू होण्यापूर्वी खासगी बसचे एजंट म्हणून काम केले. त्यानंतर भुसार मालाची खरेदी-विक्री सुरू करून छोट्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. याच व्यवसायातून पुढे ‘पवार ट्रान्सपोर्ट’ कंपनीची उभारणी केली. परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल खामगाव व जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नेऊन विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. व्यवसायात जम बसल्यानंतर स्वतःचे ट्रक खरेदी करून शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याचे कामही त्यांनी केले. साखरखेर्डा येथे मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत उपबाजार समिती स्थापन झाल्यानंतर त्यांनी अडतदार व व्यापारी म्हणून मालाची खरेदी-विक्री सुरू केली. व्यवसायाशी घट्ट नाळ जोडत त्यांनी परिसरात एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, आयुष्याच्या या प्रवासात त्यांना अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागले. दोन मुलींचे निधन, लव्हाळा-साखरखेर्डा मार्गावरील अपघातात एका मुलाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, पत्नीचे निधन, तसेच भाऊ-बहीण गमावण्याचे दुःख त्यांनी पचविले. एवढ्या मोठ्या आघातांनंतरही त्यांनी हिंमत हरली नाही. एका मुलाचा, एका मुलीचा आणि नातवंडांचा संसार उभा करण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला.

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत उभे राहिलेले बाळासाहेब पवार यांची जीवनकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. वयोमान आणि अल्पशा आजारामुळे ८ ऑगस्ट रोजी त्यांच्या जीवनप्रवासाची अखेर झाली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण साखरखेर्डा गाव हळहळले. दुपारी ३ वाजता साखरखेर्डा येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी बाळासाहेब पवार यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलूंना उजाळा दिला. तसेच शिवसेना नेते, माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राजेंद्र काटे, सुधीर बेंदाडे, बाळासाहेब बेंदाडे, बबनराव लोढे, दामोदर लांबाडे, व्ही. के. जगताप यांच्यासह गावातील शेकडो नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गौरव जगताप यांनीही बाळासाहेब पवार यांच्या सामाजिक व व्यावसायिक कार्याची माहिती देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Share This Article
Exit mobile version