-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन; दोन दिवस मोफत तपासणी, उपचार व विविध आरोग्य सुविधा
वर्धा (प्रकाश कथले) : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘आरोग्य अमृत महोत्सवा’ अंतर्गत जिल्ह्यातील दुसरे महाआरोग्य शिबिर ८ व ९ ऑगस्ट रोजी आष्टी तालुक्यातील तळेगाव (शामजीपंत) येथील पी. आर. पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, अरुण लखानी, समीर कुणावार, राजेश बकाने, सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, हृदयरोग, मेंदूरोग, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, पोटाचे विकार तसेच संसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन, औषध वितरण आणि पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी व लाभार्थी सहाय्य केंद्रही शिबिरस्थळी कार्यरत राहणार आहे.
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून, नोंदणीपासून तपासणी, उपचार आणि औषध वितरणापर्यंत सर्व सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी स्वतंत्र दालनेही उभारण्यात आली आहेत. शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड अथवा आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मोबाईल क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

