आळंदीतील अण्णाभाऊ साठे स्मारक तात्काळ विकसित करण्याची मागणी

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे यांचा इशारा; मागण्या मान्य न झाल्यास सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विराट जनआंदोलन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी आळंदी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर तातडीने स्मारक विकसित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे यांनी केली. या मागणीसाठी सकल मातंग समाज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) तसेच झोपडपट्टी सुरक्षा दल संलग्न महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दलाच्या वतीने नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

आळंदीत स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी न्यायालयीन स्थगितीमुळे काम रखडले आहे. ही स्थगिती तातडीने उठवून स्मारकाचे काम सुरू करावे, तसेच नियोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आवश्यक सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामाला गती द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या संदर्भातील निवेदन आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने बांधकाम विभागप्रमुख मनीष गायकवाड यांनी स्वीकारले. त्यांनी न्यायालयीन स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. यावेळी नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे, फाउंडेशनचे अध्यक्ष नानासाहेब साठे, सचिव सूर्यकांत खुडे, खजिनदार सुरेशनाना झोंबाडे, झोपडपट्टी सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष लक्ष्मण सोनवणे, लहुजी योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम वेळेकर, लहुजी टायगर संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात न्यायालयीन स्थगिती तातडीने उठविणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे काम युद्धपातळीवर सुरू करणे, दर महिन्याला कामाचा प्रगती अहवाल जाहीर करणे तसेच स्मारकाच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नसून सर्व बहुजन, शोषित आणि वंचित समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन स्मारकासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल.

क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर नवगिरे, उद्योजक बाळासाहेब झोंबाडे, बाबू नांदे, विजय दिपके, धनराज सकट, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष हावडे, अजय मिटकरी, मनीष कांबळे, राहुल बाजार, आदित्य गालफाडे, ऋषिकेश वाघमारे, कुमार शिंदे, सनी गवई, उद्योजक कुमार मगर, सुमित लांडगे, नेताजी लोखंडे, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश टेळेपाटील, करण उमप, भानुदास मदने, धीरज कांबळे तसेच झोपडपट्टी सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनीही मागण्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे म्हणाले, “अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम आणखी रखडू देणार नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल.” मागण्या तातडीने मान्य न झाल्यास गाव, शहर, तालुका आणि जिल्हास्तरावर विराट मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

Share This Article
Exit mobile version