जालना जिल्हा रुग्णालयात प्रथमच आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-अधिष्ठाता डॉ. सायदा अफ्रोझ व वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचारांना प्रारंभ; गरीब रुग्णांसाठी मोफत सुविधा

जालना (सुरेश हुसे) : जालना जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच अत्याधुनिक आर्थ्रोस्कोपी (दुर्बीणद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया) यशस्वीरीत्या पार पडली असून, आधुनिक वैद्यकीय सेवेकडे रुग्णालयाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आता जालना जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना महागड्या उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहणार नसून, जिल्हा रुग्णालयातच अत्याधुनिक उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहेत.

घनसावंगी तालुक्यातील ३२ वर्षीय साहेबराव राठोड यांना जुन्या गंभीर दुखापतीमुळे चालताना व पाय टेकताना गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या. तसेच गुडघ्याचा सांधा वारंवार निखळत असल्याने त्यांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम झाला होता. तपासणीत त्यांच्या गुडघ्यातील PCL (Posterior Cruciate Ligament) हा प्रमुख अस्थिबंध फाटल्याचे तसेच मेनिस्कस (Meniscus) फाटल्याचे निदान झाले. ४ ऑगस्ट रोजी रुग्णालयात नुकतेच उपलब्ध झालेल्या हाय-डेफिनिशन (HD) कॅमेरायुक्त आर्थ्रोस्कोपी मशीन आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणांच्या साहाय्याने ही जटिल शस्त्रक्रिया अवघ्या दीड ते दोन तासांत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असून, पुढील तीन ते चार दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निधीतून उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक आर्थ्रोस्कोपी मशीनमुळे ही सुविधा सुरू झाली आहे. मराठवाड्यातील मोजक्याच जिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली ही सुविधा आता जालना येथेही सुरू झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १.२० लाख ते २ लाख रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. अस्थिव्यंगोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. अब्दुल्ला अन्सारी यांनी सांगितले की, नवीन आर्थ्रोस्कोपी मशीनच्या साहाय्याने जिल्हा रुग्णालयात पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता गरीब व गरजू रुग्णांना महागड्या उपचारांसाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी वेदना, कमी जखम आणि जलद पुनर्वसन शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. सायदा अफ्रोझ आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमोल साळवे, डॉ. तेजस ताठे, डॉ. राजेश चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेश मुलगीर, ओटी इन्चार्ज शीतल सरदार तसेच परिचारिका, ओटी कर्मचारी आणि वैद्यकीय पथकातील सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात आता नियमितपणे आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, भविष्यात खांद्याची आर्थ्रोस्कोपी (Rotator Cuff Repair), गुडघा व खुबा सांधारोपण (Joint Replacement) तसेच स्पोर्ट्स इंज्युरीवरील प्रगत शस्त्रक्रिया देखील सुरू करण्याचा मानस आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांना आधुनिक, सुरक्षित आणि मोफत अस्थिरोग उपचारांची नवी सुविधा उपलब्ध झाली असून, शासकीय आरोग्य सेवेसाठी हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत आहे.

Share This Article
Exit mobile version