भोटा-खामगाव एस.टी. बससेवा अखेर सुरू; ‘मनविसे’च्या पाठपुराव्याला यश

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

जलंब पुलाच्या कामामुळे ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत; भोटा, हिंगण्यासह पंचक्रोशीतील विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा दिलासा!

नांदुरा (तालुका प्रतिनिधी) : जलंब येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली भोटा ते खामगाव एस.टी. बससेवा अखेर मंगळवारी पूर्ववत सुरू झाली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) घेतलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने ही सेवा पुन्हा सुरू केली असून, यामुळे भोटा आणि परिसरातील गावांमधील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे ही बससेवा अचानक स्थगित करण्यात आली होती. परिणामी भोटा, हिंगणा (भोटा), कालवड, कठोरा, भास्तन, रोटी, हिंगणा (इसापूर) आणि पंचक्रोशीतील प्रवाशांसह शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते. ही अडचण लक्षात घेऊन मनविसेने ११ जुलै रोजी खामगाव आगार प्रमुखांना लेखी निवेदन देऊन बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. एस.टी. प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी ७:३० वाजता भोटा येथून खामगावसाठी बस पुन्हा मार्गस्थ केली.


चालक-वाहकांचा सत्कार

दीर्घकाळानंतर गावात बस दाखल होताच ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कर, जिल्हा सचिव राहुल चोपडे आणि सरपंच पती कडू भोटकर यांच्या हस्ते बसचे चालक जाधव व वाहक योगेंद्र डोंगरे यांचा शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मनविसेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भोटा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version