नंदूरबार (आफताब खान) – नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामसमुहातील वडसत्रा, सागाळी, भादवड येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या सहयोगाने सुरु असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जागतिक बॅक अर्थसहाय्यीत याहा आदिवासी नवापूर फार्मस प्रोड्युसर कंपनी, वडसत्रा, नेसू परिसर शेतकरी उत्पादक कंपनी लि., सागाळी, शिवम डेअरी फॉर्म, भादवड पशुखाद्य निर्मिती उद्योग,भात गिरणी, तेलघाणा प्रकल्प अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट देवून प्रकल्प चालवितांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी प्रकल्पांच्या संचालकांनी सुरु असलेल्या भात गिरणी, भात पीक उत्पादनवाढीसाठी सुरु असलेले प्रयत्न, रेशीम शेतीतील नाविण्यपूर्ण प्रयोग व तयार झालेले रेशीमकोश उत्पादन, सुधारीत चारा लागवड तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, मुक्त संचार गोठा, देशी गोपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्पांविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी कंपनीचे संचालक शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

