-गंधारी जि.प. शाळेजवळ नाली खोदकामाला सुरुवात; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना
लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यात ३० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर गंधारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येबाबत वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेत उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मुख्य रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट शाळेच्या आवारात येत असल्याने दरवर्षी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा आणि शाळेच्या परिसरात पुन्हा पाणी साचू नये, यासाठी प्रशासनाने नाली खोदकामाच्या कामाला सुरुवात केली आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन आंधळे आणि उपाध्यक्ष राधेश्याम आंधळे यांनी शाळेच्या परिसरातील गंभीर परिस्थितीची माहिती प्रशासनाला देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या समस्येचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक कार्यवाही सुरू केली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शाळेच्या आवारात दरवर्षी पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत होते. अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नव्हती. मात्र, वृत्तपत्राने हा प्रश्न अधोरेखित केल्यानंतर प्रशासनाने तातडीने नाली खोदकाम सुरू केल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या गंधारी जिल्हा परिषद शाळेजवळ नाली खोदकामाचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या परिसरात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक, पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

