-तात्काळ दुरुस्तीची मागणी; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा
लोणार (वाजिद खान) : लोणार शहरातील एमटीडीसी (MTDC) समोरील उतारावर निर्माण झालेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनचालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयासमोर तसेच मारोती पारा परिसरातील रस्त्यांवरही मोठे खड्डे पडले असून अपघाताचा धोका वाढला आहे. या धोकादायक परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणार शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाच्या निष्काळजी कारभाराचा तीव्र निषेध केला.
यावेळी तालुकाध्यक्ष अंबादास पाटील खंड आणि शहराध्यक्ष मो. तौफिक कुरेशी यांनी प्रशासनावर टीका करत सांगितले की, अनेक दिवसांपासून हे जीवघेणे खड्डे नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमटीडीसीसमोरील उतारासह शहरातील धोकादायक खड्ड्यांची तातडीने सिमेंट काँक्रिट अथवा उच्च दर्जाच्या डांबरीकरणाद्वारे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम मागणी आहे. पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत सांगितले की, या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते भगवानराव सानप, कार्याध्यक्ष विठ्ठलजी आटोळे पाटील, शहराध्यक्ष मो. तौफिक कुरेशी, इब्राहिम सर, वितेश चव्हाण, मेराज पठाण, विनोद आघाव, संजय अंभोरे, प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर शेवाळे, अभिजीत सानप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
“नागरिकांचा जीव सर्वांत मौल्यवान आहे. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन एमटीडीसीसमोरील तसेच शहरातील इतर जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”
— मो. तौफिक कुरेशी,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, लोणार

