संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत भव्य रक्तदान शिबिर

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-१४५ रक्तदात्यांचा सहभाग; पूजा, महाप्रसाद, फळवाटप व विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा

आळंदी (अर्जुन मेदनकर) : मराठा समाजभूषण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाज आळंदी शहर व आळंदी पंचक्रोशीच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींच्या चलपादुकांचा अभिषेक, पूजा, दर्शन तसेच वेदमंत्रांच्या जयघोषात पसायदानाचा कार्यक्रम पार पडला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील पुरातन श्री गणेश मंदिरात चलपादुकांची पूजा माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, अरुण कुरे, अर्जुन मेदनकर, बाबासाहेब भंडारे, उत्तम भोसले, भागवत शेजूळ, राम कदम आणि गोवर्धन जंगले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आळंदी येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत सलग तिसऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल १४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर त्यामध्ये १० महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. आळंदी शहर व पंचक्रोशीतील युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रक्तदान शिबिराचा शुभारंभ संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून करण्यात आला. त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, जालिंदर महाराज भोसले, पुणे जिल्हा परिषद सदस्या विनयाताई सुधीर मुंगसे, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे, अजित घुंडरे, माजी नगरसेवक पांडुरंग वहिले, भाजपचे सरचिटणीस किरण येळवंडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे, अरुण कुरे पाटील, अर्जुन मेदनकर, भागवत शेजूळ, बालाजी शिंदे, रमाकांत शिंदे, शशिकांत राजेजाधव, जयसिंग कदम, राम कदम, दत्ता फराटे, महेशकुमार भोसले (बालाजी ब्लड बँक, सातारा), नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाताताई तापकीर, गटनेते रामदास भोसले, दिनेश घुले, सोमनाथ कुऱ्हाडे, वैजयंता उमरगेकर, विजय तापकीर, मंगेश काळे तसेच आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाजप्रबोधन व राष्ट्रनिर्मितीतील कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी समाजाच्या न्यायहक्कांसाठी दिलेल्या लढ्याचा गौरव करत रक्तदानासारख्या उपक्रमातून समाजसेवेची प्रेरणा प्रत्येक तरुणाने जपावी, असे आवाहन केले. याशिवाय वारकरी सांप्रदायिक प्रशिक्षण शिबिर, ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात आरती, महाप्रसाद, फळवाटप तसेच अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पाणी व फळवाटपाचे उपक्रमही राबविण्यात आले. या उपक्रमासाठी युवा नेते अरुण कुरे, भागवत शेजूळ, अर्जुन मेदनकर, जयसिंग कदम, शशिकांत जाधव, दत्ता फराटे, बालाजी शिंदे, रमाकांत शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्या विनयाताई मुंगसे आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडल्याचे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

Share This Article
Exit mobile version