-२१ वर्षांत गिट्टीचाही खडा नाही; सात दिवसांत काम सुरू न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील एमडीआर-४५ ते नायगाव देशमुख हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत सन २००४-०५ मध्ये बांधण्यात आलेला ३.८ किलोमीटर लांबीचा रस्ता आज पूर्णपणे जीर्ण झाला असून, तब्बल २१ वर्षांत या रस्त्यावर गिट्टीचाही एक खडा टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे हा रस्ता आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याची तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येत्या सात दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलन संयोजक गोपाल सुरडकर, रामगोपाल जाधव व ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ता विकास यंत्रणा (PMGSY) तसेच कार्यकारी अभियंता यांना ३१ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या रस्त्यावरून दररोज शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका तसेच हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने पावसाळ्यात रस्ता आणि खड्डा यातील फरकही ओळखणे कठीण झाले आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्त्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून नूतनीकरण व डांबरीकरणास मंजुरी द्यावी, काम सुरू होण्याची निश्चित तारीख जाहीर करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी केली आहे. सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही किंवा ठोस कार्यवाही झाली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत आमदार सिद्धार्थ खरात व माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनाही देण्यात आली आहे.
“नायगाव देशमुखच्या जनतेने अनेक वर्षे आश्वासनांवर विश्वास ठेवला; मात्र आता संयमाचा अंत झाला आहे. आम्ही कोणाकडे दया मागत नाही, तर आमच्या गावाचा हक्काचा रस्ता मागत आहोत.”
— गोपाल महादेव सुरडकर, आंदोलन संयोजक