पुनर्गठित पीककर्जधारक शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्या

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-२०१८ मधील कर्ज पुनर्गठनामुळे ३७ शेतकरी वंचित; जिल्हा उपनिबंधकांकडे शेतकरी संघटनेचे निवेदन

चिखली (राजेंद्र घुबे) : सन २०१८ मध्ये ग्रामसेवा सहकारी सोसायटीमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेळगाव आटोळ शाखेतून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहावे लागल्याचा आरोप करत, या शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, प्रकाश येडूजी घुबे व अन्य शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन २०१८ मध्ये ग्रामसेवा सहकारी सोसायटीमार्फत अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेळगाव आटोळ शाखेतून अल्पमुदतीचे पीककर्ज घेतले होते. त्या वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत ते थकीत ठरणार होते. मात्र तत्कालीन गटसचिव सुभेदार व बँक निरीक्षक बोर्डे यांनी शासनाच्या १९ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल व नवीन कर्ज मंजूर केले जाईल, असे सांगून शेतकऱ्यांकडून पुनर्गठनाच्या संमतीपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र त्यानंतर नवीन कर्जाचे वाटप करण्यात आले नाही. त्यानंतर तत्कालीन शासनाने १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. नियमानुसार संबंधित शेतकरी ३१ मार्च २०१९ रोजी थकीत ठरत असतानाही त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन दाखविण्यात आल्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. विशेष म्हणजे, ज्यांनी पुनर्गठनाच्या संमतीपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला; मात्र सुमारे ३७ शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज तसेच त्याचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन झालेले कर्ज, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत व ३१ मार्च २०२६ पर्यंत अपूर्ण परतफेड असलेले कर्ज दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफीस पात्र आहे. त्यामुळे सन २०१८ मधील पीककर्जाचे ३१ जुलै २०१९ रोजी पुनर्गठन झाले असल्याने ती तारीख ग्राह्य धरून संबंधित शेतकऱ्यांनाही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version