बुलढाणा जिल्ह्यात आभाळ फाटले; जळगाव जामोद आणि संग्रामपूरमध्ये महाप्रलय!

admin Add a Comment 7 Min Read
7 Min Read

– ९२ पैकी ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टी; जळगाव जामोदमध्ये २४ तासांत २५५ मिमी पावसाची नोंद; शेगाव येथे घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू
– पिके पाण्याखाली; नदी-नाल्यांना महापूर, अनेक गावांचा संपर्क तुटला; आठवडाभरात नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलनाचा रविकांत तुपकरांचा इशारा

बुलढाणा (बाळू वानखेडे) : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. हवामान विभागाच्या ‘यलो अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, ९२ पैकी तब्बल ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला असून, जळगाव जामोदमध्ये अवघ्या २४ तासांत २५५ मिमी पावसाची नोंद झाल्याने तेथे ‘महाप्रलया’ची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेगाव येथे घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून
जिल्हा प्रशासनाला मदत व बचावकार्यासह पंचनामे करण्याचे आदेश

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू केले आहेत. पूरस्थितीची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. बाधित भागांतील पंचनामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. दरम्यान, पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनीही जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून पूरस्थितीचा नियमित आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सततच्या पावसामुळे उभी पिके, घरे तसेच विविध पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. बाधित शेती, घरे आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असून प्रशासनाकडून चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे तसेच नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

नद्या-नाल्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अन्नधान्य, कपडे आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. ईलोरा गाव तर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. पुराच्या प्रचंड लोंढ्यामुळे शेतांतील उभी पिके पाण्याखाली गेली असून, नुकतीच उगवू लागलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सुपीक जमीन खरडून गेली असून, शेतांचे रूपांतर चक्क नदीपात्र आणि तलावांमध्ये झाल्याचे विदारक चित्र आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीजखांब आणि तारा कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यातच मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने अनेक गावांचा संपर्कही पूर्णपणे तुटला आहे.  बुलढाणा १०५ मिमी , चिखली ११०, देऊळगाव राजा ८३ सिंदखेड राजा ९८, लोणार १०० मेहकर १११, खामगाव १५२ मिमी, शेगाव १४०, मलकापूर १३१, मोताळा १०७, संग्रामपूर ११८ अशी इतर तालुक्यातील पावसाची आकडेवारी आहे.


नद्यांना महापूर; धरणांमधून विसर्ग

जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

  • संग्रामपूर तालुका : चोंडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
  • मेहकर तालुका : पेनटाकळी प्रकल्प ५६.५१ टक्के भरला असून, पुढील काही तासांत पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार निलेश मडके यांनी दिली आहे.
  • खामगाव तालुका : अंत्रज परिसरात बोर्डी नदीला मोठा पूर आला असून, परिसरातील अनेक गावांत पाणी शिरले आहे.
  • पैनगंगा नदी : पैनगंगेला आलेल्या पुरामुळे येळगाव धरण १०० टक्के भरले आहे. बुलढाणा-रायपूर मार्गावरही पैनगंगेला मोठा पूर आला आहे.

वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. बुलढाणा-खामगाव महामार्गावरील सुंदरखेड परिसरात, भादोला नजीक तसेच शिरजगावजवळ बाभळीची झाडे कोसळल्याने वाहतूक अनेक तास ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बुलढाणा-चिखली महामार्गावरील साखळी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत आहे. रिमझिम पाऊस आणि पुलावरून वाहणारे पाणी अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीतही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जीव धोक्यात घालून वार्तांकन करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाहने न घालण्याचे आवाहन केले असून, चिखलीला जाण्यासाठी सव-खुपगाव-किन्होळा-केळवद या पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


आठवडाभरात मदत द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू : रविकांत तुपकर

या भीषण परिस्थितीची गंभीर दखल घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची तात्काळ व्यवस्था करावी, शेती व घरांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करावेत आणि आठवडाभराच्या आत शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. “शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना या महापुराने त्याच्या उरल्यासुरल्या आशाही वाहून नेल्या आहेत. सरकारने केवळ पाहणी दौरे करून वेळ घालवू नये. तातडीने मदतीचे निर्णय घ्यावेत. आठवडाभरात मदत न मिळाल्यास पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट आणि आक्रमक इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. प्रशासनाकडून सध्या बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने प्रशासनाची यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर आहे.


पेनटाकळी धरण ५६.५१ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पेनटाकळी प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरू असून, शुक्रवार (३१ जुलै) रोजी धरणातील जलसाठा ५६.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाण्याची आवक वाढल्यास धरणातून विसर्ग करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मेहकर यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, प्रकल्पाच्या मंजूर जलाशय व द्वार संचालन सूचीनुसार जुलैअखेर धरणात ६९ टक्के जलस्तर कायम ठेवण्याचे नियोजन आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यास तसेच उर्ध्व बाजूच्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग झाल्यास पेनटाकळी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीपात्रात विसर्ग सोडावा लागू शकतो.

जलसंपदा विभागाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच जनावरे, वाहने, शेती अवजारे, चल मालमत्ता आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन केले आहे. तसेच दवंडी किंवा मुनादीद्वारे नागरिकांना सूचना देऊन प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version